पुणे: राज्यात पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्राच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण आणि मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार, तर बहुतांश भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर राहील, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
2 ऑक्टोबर- या दिवशी परभणी, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात ढगांच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
3 ऑक्टोबर- या दिवशी औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर
4 ऑक्टोबर – औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता, मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान सल्ला पत्रकात वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने परतीच्या पावसाचा अंदाजदेखील व्यक्त केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास 06 ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाचे दिल्ली येथील तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी ट्वीट करून याविषयी माहिती दिली. मान्सूनचा परतीचा प्रवास वायव्य भारताच्या काही भागांतून सुरु होईल.
गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 25 लाख 98 हजार 213 हेक्टरचे नुकसान झाले आहे. हा आकडा 30 लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकतो. महसूल प्रशासनाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात सुमारे 2254 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच याचा अंतिम अहवाल 3000 कोटी रुपयांचा असू शकतो. पहिल्या टप्प्यातील अहवाल मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महसूल उपायुक्त पराग सोमण यांनी गुरुवारी दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीमुळे नाशिकमधली 14 धरणे काठोकाठ भरलीयत, तर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार गेलाय. जिल्ह्यात पावासने लावलेल्या दमदार हजेरीमुळे अनेक ठिकाणी हाहाकार उडालाय. मनमाड, नांदगाव या ठिकाणी दोनदोनदा पूर आला. नाशिकमध्ये गोदावरीला चार वेळा पूर आला. गंगापूर धरण समूह भरलाय. गंगापूर धरणातून सतत विसर्ग सुरू होता. तूर्तास तरी पावसाच्या या तडाखेबंद बॅटींगनं जिल्ह्याची तहान भागलीय. जिल्ह्यातल्या चौदा धरणांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर गेलाय. त्यात गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे. तीसगाव, चणकापूर, पुनद ही धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत.
संबंधित बातम्या:
ढगांचा ढोल घुमू लागला… मराठवाड्यात पुन्हा पावसाला सुरुवात, वीजांच्या कडकडाटासह सरी