पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत लोकसभा, विधानसभेसह महापालिका निवडणुकांवर चर्चा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर ठाकरे गटाने ही बैठक बोलावल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. या बैठकीपूर्वीच पुणे जिल्ह्याच्या ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाने आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे.
जिल्हा प्रमुखांच्या बैठकीआधी उद्धव ठाकरे गटाला धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे हे सुद्धा उपस्थित होते.
महेश पासलकर हे ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख आहेत. तसेच वीर बाजी पासलकर ग्रामीण विकास केंद्राचे ते अध्यक्षही आहेत. पासलकर हे अत्यंत संघर्षातून जिल्हाप्रमुख पदावर पोहोचले होते. त्यांची कौटुंबीक स्थिती अत्यंत हालाखीची होती. इयत्ता अकरावीत असताना पासलकर यांनी दौंड तालुक्यांतील केडगाव येथे नेवसे यांच्या चहाच्या टपरीवर कपबश्या धुण्याचेही काम केले. त्यांनी तालुक्यांतील केडगाव, दापोडी, बोरी, वाखारी, वरवंड, पाटस, कुरकूंभ आदी गावांमध्ये विहिरी खोदण्याच्या मशिन ( यारी )वरही काम केले. मुंबईत आल्यावर त्यांनी काही काळ रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.
त्याचवेळी ते शिवसेनेकडे आकर्षित झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी त्यांना भूरळ घातली. त्यामुळे ते अंधेरीतील शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊ लागले. त्यावेळी माजी आमदार रमेश लटके, माजी मंत्री रविंद्र वायकर आणि भाऊ कोरगावकर यांच्या संपर्कात आले. तिथेच त्यांची शिवसैनिक म्हणून जडणघडण झाली.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी चर्चा होणार आहे. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं समजतं.