वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण राज्यातच नाही तर देशात गाजत आहेत. त्यानंतर एकामागून एक आरोपांची मालिकाच या कुटुंबाविरोधात समोर आली. एक एक धक्कादायक खुलासे समोर आले. त्यात त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला. त्यानंतर प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत गेल्यापासून त्यांच्या तक्रारींचा सूर वाढला आहे. पोलिसांवर त्यांनी आरोपांची राळ उडवली आहे. कोठडीतही त्यांचा ताठा कायम असल्याचे दिसत आहे.
कोठडीतही दाखविला ताठा
पोलीस कोठडीत मनोरमा खेडकर यांचा ताठा कायम असल्याचे दिसून आले. पोलिसांवर त्यांनी एकामागून एक आरोप केले. कोठडीतील असुविधांविषयी त्यांनी कोर्टासमोर माहिती दिली. कोठडीतील जेवण बेचव, असल्याचा आरोप मनोरमा खेडकर यांनी केला आहे. जेवण बेचव असल्याचा आरोप पोलिसांनी फेटाळला
तक्रारीचा सूर काही संपेना
मनोरमा खेडकर यांनी कोठडीत असूविधा असल्याचा पाढा वाचला. आपल्याला वेळेवर जेवण मिळत नसल्याचा आरोप केला. चहा तर सकाळी 9 वाजता देण्यात आला. जेवण दुपारी दीड वाजता देण्यात आले. कोठडीतील जागा ओली असल्याचा आरोप त्यांनी केला. कोर्टाने या सर्व आरोपांची दखल घेतली. कोठडीतील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयाने मागितले. तसेच सगळ्या गोष्टी वेळेवर देण्याचे निर्देश दिले. न्यायालय पुढील सुनावणी वेळी सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहे.
दरम्यान मनोरमा खेडकरच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत तपास पूर्ण करण्याच्या सूचना कोर्टाने पोलिसांना दिल्या. मनोरमा खेडकर यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला.
आता न्यायवैद्यकच्या अहवालाची प्रतिक्षा
मावळ तालुक्यातील एका जमिनीसंदर्भात वाद समोर आला होता. त्यात खेडकर या शेतकऱ्यांना हातात पिस्तूल घेऊन धमकावत असल्याचे समोर आले होते. यापूर्वी तक्रार देण्यात आली होती. पण पूजा खेडकर यांचे प्रकरण तापल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची लागलीच दखल घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरमा खेडकर यांनी वापरलेली पिस्तुल फॉरेन्सिक लॅबला पाठवली जाईल. मनोरमा खेडकर यांनी गोळी झाडली होती का, हे फॉरेन्सिकच्या अहवालात समोर येईल. सदर पिस्तूल त्यांनी कुठून खरेदी केले. त्याविषयीच्या कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत.