पुणे : भारतात रक्तदानाविषयी जनजागृती (Awareness about blood donation) करण्यासाठी केरळमधील तिरुवनंतपुरम येथून एक व्यक्तीने जनजागृतीस सुरुवात केली आहे. तब्बल 21,000 किलोमीटरचा पायी प्रवास केल्यानंतर जवळपास आठ महिन्यांनंतर ही व्यक्ती पुण्यात दाखल झाली आहे. किरण वर्मा (Kiran Verma) असे 37 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. 25 ऑगस्ट रोजी ते पुण्यात पोहोचले. दिल्लीस्थित सामाजिक कार्यकर्ता किरण वर्मा यांनी दगडूशेठ गणेश मंडळाला भेट दिली आणि सांगितले, की रक्तदानाबद्दल जनजागृती करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. जेणेकरून भारतात कोणीही रक्ताच्या कमतरतेमुळे आपला प्राण गमावू नये. 28 डिसेंबर 2021 रोजी आपल्या पदयात्रेला (Walk) सुरुवात करणारे वर्मा म्हणाले, की या कठीण काळातही रक्तपेढ्या आणि रुग्णालये याठिकाणी रक्ताची कमतरता पडू नयेत म्हणून लोकांना बाहेर जाऊन रक्तदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा वॉक आहे.
वर्मा यांचे हे कार्य हे एखाद्या व्यक्तीची आतापर्यंतची सर्वात मोठी रक्त जागृती मोहीम असणार आहे. कारण यास दोन वर्षांहून अधिक कालावधी लागणार आहे. कोविडच्या वाढत्या केसेसमुळे गेल्या 2 वर्षांपासून भारतात ऐच्छिक रक्तदान कमी झाले आहे, असे ते म्हणाले. वर्मा हे नॉन-प्रॉफिट चेंज विथ वन फाऊंडेशनचे संस्थापक आहेत. याअंतर्गत ते सिंपली ब्लड आणि चेंज विथ वन मील असे दोन कार्यक्रम चालवतात. 2018मध्ये त्यांनी याच कारणासाठी भारतभर 16,000 किमीचा प्रवास केला, त्यात 6,000 किमी पेक्षा जास्त पायी प्रवास केला.
सिंपली ब्लड हे व्हर्च्युअल रक्तदान प्लॅटफॉर्म आहे, जे रक्तदाते आणि साधकांना रिअल टाइममध्ये जोडते. ते 29 जानेवारी 2017 रोजी सुरू करण्यात आले आणि आजपर्यंत रक्तदानाद्वारे 35,000हून अधिक प्राण वाचवण्याचे कार्य केले आहे.
वर्मा यांच्या वाटचालीला पाठिंबा देण्यासाठी देशाच्या विविध भागात 48 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून त्याद्वारे 7,239 युनिट्सहून अधिक रक्त संकलित करण्यात आले आहे. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी शिबिरांव्यतिरिक्त, 3,000हून अधिक वैयक्तिक रक्तदात्यांनी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार भारत आणि परदेशातील विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान केले आहे.
वाराणसीमध्ये 3.5 किमी मॅरेथॉनचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये 100हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. आतापर्यंत, वर्मा म्हणाले की आपण देशभरातील अनेक जिल्हे फिरलो आहोत. 6,800 किमीपेक्षा जास्त अंतर व्यापले आहे. पुण्यानंतरचे पुढचे ठिकाण सोलापूर आणि लातूर असेल, असे ते पुढे म्हणाले.