पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात 23 तारखेला मराठा बांधव खंजीर दिवस (Khanjir divas) साजरा करणार आहेत, अशी माहिती योगेश केदार यांनी दिली आहे. ते म्हणाले, की शरद पवार (Sharad Pawar) यांनी 23 मार्च 1994ला ओबीसींचे (OBC) 14 टक्के असलेले आरक्षण हे 30 टक्के केले. यामागे कोणताही आयोग किंवा समिती नेमली नाही तसेच आरक्षण मर्यादाही वाढवली. 50 टक्क्यांच्या आतच मराठ्यांना आरक्षण मिळू शकते. जिथे गमावले तिथेच आम्ही हे शोधणार आहोत. 23 मार्चला शरद पवार तसेच चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर आंदोलन करणार आहोत. आम्हाला आमचा हक्क मिळायला हवा, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. कोणत्याही आयोगाशिवाय ओबीसींना आरक्षण मिळू शकते, तर मराठा समाजास का नाही, असा सवाल यावेळी करण्यात आला आहे. आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असाही आता सूर उमटत आहे.
मराठा आरक्षण (Maratha Reservation Case) रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने पाच मे 2021ला दिला. महाराष्ट्र राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत, अशी दुरुस्ती संपुष्टात आल्याचे सांगितले होते. तर 50%ची मर्यादा ओलांडून दिलेले आरक्षण अवैध असल्याचे कोर्टाने सांगितले.