प्रदीप कापसे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, दौंड, पुणे : मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. या काळात सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असं जरांगे पाटील म्हणाले होते. त्यांनी सरकारला दिलेली मुदत काल संपली. मात्र अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या या आंदोलनाला ठिकठिकाणाहून पाठिंबा मिळत आहे. या आंदालनाचे आता राजकीय पडसादही आता उमटू लागले आहेत. तीन जणांनी राजीनामा दिली आहे.
पुणे जिल्ह्यातही मराठा आरक्षणाचं लोन पसरलं आहे. दौंड तालुक्यातील कानगाव ग्रामपंचायतीतील 3 जणांनी राजीनामा दिला आहे. ग्रामपंचायत सदस्यत्वाचा या तिघांनी राजीनामा दिला आहे. कानगावच्या सरपंचांकडे हा राजीनामा सुपूर्द केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तिघांनी राजीनामा दिला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचं या ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितलं आहे.
आरक्षणाबाबत पुणे जिल्ह्यात मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. खेड तालुक्यात अनेक गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी नंतर खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाची पुढची दिशा ठरली आहे. एमआयडीसी परिसरात जाणाऱ्या सर्व मार्गांवरील बसेस रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मराठा आरक्षण दिलं नाही. तर 25 तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला होता. त्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाकडून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या बस रोखल्या गेल्या आहेत. मोशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
मराठा आरक्षणाबाबत मराठी क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात थोड्याच वेळात मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद घेणार आहे. मराठा क्रांती मोर्चा करणार आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.