सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा बार उडाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवार एकमेकांवर जहरी टीका करत आहेत. पण मावळ लोकसभा मतदार संघातील मतदारांना मात्र वेगळाच अनुभव आला. त्यांनी या वातावरणातही हसण्याचे दोन क्षण अनुभवले. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितेने सभेत जाण आणली. एकच हस्यकल्लोळ उठला. हसून हसून लोकांच्या मुरकुंड्या वळल्या.
उपस्थितांनी दिली जोरदार दाद
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या खास शैलीत प्रचारात रंगत आणली. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी ते आले होते. त्यांनी यावेळी त्यांच्या खास शैलीत कविता सादर केली. त्याला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. हरणे, बारणे अन कारणे या शब्दांचं यमक त्यांनी जुळवले. ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव श्रीरंग बारणे, नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर आहेत अनेक कारणे, का निवडून येणार नाहीत आप्पा बारणे, असे यमक त्यांनी जुळवले. नारा, सारा, तारा अन बारा यांची सांगड घालून मोदी सरकार काँग्रेसला या निवडणुकीत पराभूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मुद्यांवरील त्यांच्या कवितेला उपस्थितांनी दाद दिली.
महिलांच पुरुषांपेक्षा सक्रिय
सभास्थळी महिलांची उपस्थिती जास्त आहे, महिलाच पुरुषांपेक्षा जास्त हुशार असतात, महिला ऍक्टिव्ह असतात, कुटुंब सांभाळतात, मुलाला सांभाळणं सोप आहे, पण नवऱ्याला सांभाळणं अवघड आहे, असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला. मोदींना हरवणे सोपं काम नाही, त्यांच्या पाठीशी देशातील महिला आहेत. महिलांना लोकसभेत, विधानसभेत आरक्षण दिल. सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला त्यांचे आभार मानतो, पाठिंबा दिला नसता तर महिला त्यांच्या विरोधात गेल्या असत्या, असे ते म्हणाले.
तिकीट मिळालं नाही तर काम सुरुच
अनेक जण विचारतायत तुम्हाला तिकीट मिळालं नाही, माझी 2024 राज्यसभा आहे, नंतर मला राज्यसभा मिळेल याची कल्पना आहे. एखादी जागा मिळावी अशी अपेक्षा होती. तिकीट मिळालं नाही. तरीही माझा पक्ष काम करत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.