सातारा : माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झालाय. सातारा जिल्ह्यातल्या फलटणजवळ आमदार गोरे यांची गाडी नदीच्या पुलावरुन खाली कोसळली. गोरे यांच्या गाडीचा अपघात नेमका कशामुळं झाला? माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला सातारा जिल्ह्यातल्या फलटणजवळ भीषण अपघात झालाय. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास जयकुमार गोरे यांची गाडी पुण्याहून सातारा जिल्ह्यातल्या दहिवडीकडे जात होती. पण लोणंद ते फलटण दरम्यान असलेल्या एका पुलावर जयकुमार गोरे यांच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. आणि गाडी थेट पुलाचा कठडा तोडून बाणगंगा नदीपात्रात कोसळली.
अपघातानातंतर जयकुमार गोरे कसेबसे गाडीबाहेर आले. आणि त्यांनी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना फोन केला. खासदार निंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी आमदार गोरे यांना अॅम्ब्युलन्सने रुग्णालयात हलवलं.
रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, मला गोरे यांचा फोन आला. त्यांनी लोकेशन सांगणं शक्य नसल्याचं सांगितलं. 5 ते 6 मिनिटात मी पोहोचलो. 70-80 फुटांवरून गाडी खाली पडली होती. गोरे जिकडे बसतात त्याच बाजूला गाडी पडली होती. गाडीतले सीट्स तुटले होते.
ड्रायव्हर आणि पीएला गंभीर दुखापत होती. गोरे गाडीतून बाहेर आले होते. त्यांनी सर्व कर्मचारी, स्टाफ, सेक्युरिटीला पुढच्या 5 ते 7 मिनिटात हलवलं. शेवटच्या अॅम्बुलन्समधून गोरे साहेब गेले. त्यांच्या 3 बरगड्यांना दुखापत झाली आहे.
आमदार गोरे यांचे ड्रायव्हर आणि स्वीय सहाय्यकाला बारामतीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर गोरे यांच्यावर पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आमदार राहुल कुल म्हणाले, मेडिकल पॅरामीटर स्टेबल असल्यानं चिंता करण्याचं कारण नाही. ते शुद्धीवर आहेत. त्यांच्या तब्येतीला कुठलाही धोका नाही असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आहे.
चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानंच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. दुसऱ्या गाडीबद्दल काही स्पष्ट झालं नाही. चालकाचं नियंत्रण सुटल्यानंच हा अपघात झाला असावा, असं पोलिसांनी सांगितलं. गोरेंची गाडी तब्बल 70 ते 80 फूट उंचीवरुन खाली कोसळली. पण त्यांच्या गाडीमधल्या एअर बॅग ओपन झाल्या नाहीत. या अपघातातून आमदार गोरे थोडक्यात बचावले. त्यांना अपघातस्थळी मदतही वेळेत मिळाली. त्यामुळं पुढील उपचार लवकर करणं शक्य झालं.