पुणे : पुणे शहरातील दोन मंदिरांच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा करण्यात येत आहे. मनसेने हा दावा केला आहे. मनसेचे नेते अजय शिंदे (MNS Ajay Shinde) यांनी हा दावा केला असून यासंबंधीचे पत्र त्यांनी महापालिका आणि पुरातत्व विभागाला पाठविले आहे. पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या (Punyeshwar temple & Narayaneshwar temple) जागी मशिदी बांधल्याचा त्यांनी दावा केला आहे. बंद पत्र्याच्या आड तिथे बांधकाम चालू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या मंदिराच्या नवनिर्माणासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुणे प्राचिन शहर आहे. याठिकाणचे जे जे काही आहे, ते देशाने स्वीकारले आहे. त्यामुळे अशाप्रकारे जर आक्रमण होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मंदिराच्या जागी आम्ही मशिद (Mosque) होऊ देणार नाही, असे त्यांनी म्हटले.
उत्तर प्रदेशात ज्ञानवापी मशिदीचा वाद सध्या सुरू आहे. त्यात आता पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा आरोप मनसेने केला आहे. अलाउद्दीन खिलचीच्या काळात हे सर्व घडल्याचे अजय शिंदे यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, की यामंदिरांना मोठा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर यांच्यासह जे काही समकालीन संत होते त्यांनी याठिकाणी भजन, कीर्तन केले. संत एकनाथांच्या गाथेत याचा उल्लेख आहे. हे सर्व हिंदुस्थानावर इस्लामी आक्रमण झाले, त्या काळातील असल्याचे शिंदेंचे म्हणणे आहे. हे आक्रमण पुण्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी मंदिरांच्या जागी मशिदी तसेच दर्गे उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
पुण्यात बडा अरब म्हणून एक सरदार आणि त्याच्याबरोबर दोन धर्मप्रसारक आले. सलाउद्दीन आणि इस्माउद्दीन अशी त्यांची नावे होती. यांनी ही मंदिरे नष्ट केली आणि त्याठिकाणी दर्गे उभारले. त्यातील छोटा शेख दर्गा तर पुण्येश्वराच्या जागी उभा आहे. पुण्येश्वराचे मंदिर एक एकर जागेत होते. नागेश्वराचे मंदिरदेखील भव्य होते. नारायणेश्वर मंदिर नदीपात्रातून पाहिल्यास त्याची भव्यता दिसते. मात्र हे सर्व नष्ट करून आधी दर्गे आणि नंतर त्याठिकाणी मशिदी उभारल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.