मुंबई : राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दगडूशेठ गणपती (Dagdusheth Ganpati) दर्शनावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी एक ट्विट करत शरद पवारांना लक्ष्य केले आहे. काल पुण्यात शरद पवार श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार होते. ते तिथे पोहोचलेही मात्र त्यांनी यावेळी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. तर पवार साहेब आणि आपण नॉनव्हेज खाल्ले म्हणून ते मंदिरात गेले नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली होती. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम कायम राहिला. कारण पुण्यात मांसाहाराचे कारण देत शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात जाणे टाळले, असा सवाल सध्या चर्चेत आहे. तर त्याचवेळी मनसेने यावरून शरद पवारांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
पाऊस पडत असताना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचे माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे, असा टोला अमेय खोपकर यांनी लगावला आहे. ट्विट करत त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. खरे तर हा वाद मनसेनेच सुरू केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार नास्तिक असल्याचा थेट आरोप केला होता. त्यानंतर शरद पवारांनी गणपतीचे दर्शन घेण्याचाही निर्णय घेतला, मात्र ऐनवेळी त्यांनी मांसाहारचे कारण देत मंदिराच्या आत जाणे टाळले आणि बाहेरूनच दर्शन घेतले. त्यावरून अमेय खोपकर यांनी निशाणा साधला आहे.
पाऊस पडत असतांना छत्री असून मुद्दाम पावसात भिजणे आणि दगडूशेठ गणपती दर्शनाला जायचं माहीत असून मुद्दाम मांसाहार करणे ??
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 27, 2022
शरद पवारांच्या दगडूशेठ गणपतीच्या बाहेरून दर्शनाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, मंदिरात नाही गेले तर म्हणतात नास्तिक आहेत आणि आता गेले तरी अडचण. मात्र बाहेरून नमस्कार करायला अडचण काय, असा सवाल अजित पवारांनी केला होता. दुसरीकडे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मात्र शरद पवारांचे गणपती दर्शनाबद्दल अभिनंदन केले होते.
शरद पवारांच्या कृतीने गणेशभक्त मात्र नाराज झाले. पूर्वनियोजित मंदिर दर्शन ठरलेले असताना पवारांनी मांसाहार का टाळला नाही, असा सवाल पुणेकर गणेशभक्तांनी विचारला. त्यामुळे पुन्हा शरद पवारांच्या आस्तिक-नास्तिकतेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.