अभिजीत पोटे, पुणे : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची घेतलेली मुलाखत अतिशय हास्यास्पद असून, या मुलाखतीत मुलाखत घेणारे, मुलाखत देणारे आणि मुलाखत छापणारे सुद्धा घरचेच आहेत. त्यामुळे शिवसेना हा कौटुंबिक पक्ष आहे की कौटुंबिक संघटना आहे हेच कळायला आम्हाला मार्ग नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि राज्याचे प्रवक्ते हेमंत संभूस (Hemant Sambhus) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. त्याचा पहिला भाग नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यावर मनसेने टीका केली आहे. दरवर्षी शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत संजय राऊत (Sanjay Raut) घेतात. यावर्षीही घेण्यात येत आहे. त्याचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर आता मनसेने त्यावर टीकास्त्र सोडले आहे.
हेमंत संभूस म्हणाले, की शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्वाबद्दल बोलू नये. कारण उद्धव ठाकरे यांनी आणि शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले आहे. आता त्यांचे हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांनाच न झेपणार असल्याची टीकादेखील संभूस यांनी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे न झेपलेले हिंदुत्व असा या मुलाखतीचा सारांश आहे, असे टीकास्त्र संभूस यांनी शिवसेनेवर सोडले आहे.
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी काल मनसे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर केली होती. दिपाली सय्यद यांच्या या टीकेला सुद्धा हेमंत संभूस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिपाली सय्यद यांना अगरबत्ती ही काय काय करू शकते हे माहिती नसावे. कारण ही अगरबत्ती बॉम्बदेखील फोडू शकते. आम्हाला अगरबत्ती म्हणून हिनवण्यापेक्षा स्वत: काय ते पाहावे, आत्मचिंतन करावे. दिपाली सय्यद या महिला आहेत. त्यामुळे बोलत नाही. मात्र खूप काही वेगळे बोलू शकतो. त्यामुळे आमच्या नादी लागू नका, असा इशारा हेमंत संभूस यांनी दिला आहे.
हिंदुत्व हे कृतीतून दिसते. आता भोंग्यांचाच विषय घ्या. तुम्ही सत्तेत होता. मात्र यावर काहीच झाले नाही. स्वत: बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली होती. मग तुम्ही का नाही निर्णय घेतला, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला आंदोलन करावे लागले. त्याचा काय रिझल्ट आहे, तो तुमच्यासमोर आहे, असा टोला त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना लगावला.