पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईत गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असतानाच आता मनसेतील नाराजीच्या चर्चा समोर आल्या आहेत. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांना मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. पण त्यांना भाषणच करू दिलं नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे पुणे मनसेत सर्व काही अलबेल नसल्याचीही चर्चा सुरू आहे.
पुण्यात मनसेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पुण्यातील मनसेच्या कार्यक्रमात वसंत मोरेंना बोलू दिलं नाही. त्यामुळे वसंत मोरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मोरेंना बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना पुणे कार्यक्षेत्रात काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.
वसंत मोरेंना स्थानिक पदाधिकारी डावलत असल्याने वसंत मोरेंची नाराजी कायम आहे. त्यामुळे पुण्यात स्थानिक पदाधिकारी विरुद्ध वसंत मोरे वाद सुरू झाला असून आता राज ठाकरे मोरेंची नाराजी कशी दूर करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या नाराजीच्या वृत्तावर वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी नाराज नाही. नाराज कार्यकर्ते आहेत. त्या दिवशी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात सर्व कोअर कमिटीचे मेंबर होते. मी त्या स्टेजवर आहे तर मला बोलू दिलं जाईल, असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. पण मला त्या ठिकाणी बोलायची संधी मिळाली नाही, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.
उलट कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो. तुम्ही का नाही भाषण केलं? असं विचारत होते. मी म्हटलं, भाषणाच्या यादीत माझं नावच नाही तर मी कसं भाषण करणार?, असं त्यांनी सांगितलं.
जे नेते त्या ठिकाणी होते, त्यांनी मला बोलू द्यायला हवं होतं. मलाच काय बाकीचे जे नेते होते ईश्वर शिंदे होते, लोकप्रतिनिधी होते त्यांना बोलू द्यायला हवं होतं. लोकप्रतिनिधींशी संबंधित हा कार्यक्रम होता तर त्यांना बोलू द्यायला हवं होतं. त्यांची भाषणं व्हायलं हवी होती, असंही त्यांनी सांगितलं.