पुणे : पुणे महापालिकेतील प्रभाग रचनेचे आरक्षण जाहीर झाले आहे. माझ्या प्रभागात चांगले आणि पोषक वातावरण तयार झाले आहे. तीन प्रभागात वसंत मोरे (Vasant More) फॅक्टर चालणार. मी पाच नगरसेवक निवडून आणेन, असा दावा मनसे नेते वसंत मोरे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण (PMC Municiple Election) नुकतेच जाहीर झाले आहे. त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपला प्रभाग (Ward) हा पोषक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रभाग 56, 57, 58 हा अत्यंत चांगला आहे. तर 58 या प्रभागामधून मी इच्छूक असून याठिकाणी दोन पुरूष एक महिला असे आरक्षण आहे. त्यामुळे माझी लढाई सोपी आणि सरळ झाली आहे. याठिकाणी यश मिळणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मनसेची मुंबईतील रंगशारदामध्ये बैठक झाली होती. यात राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या होत्या. कोणीही राजकीय बोलणार नाही. मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातील पत्र हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्येक शहरात मिळणार आहे. ते प्रत्येकाच्या घरी पोहोचवले जाणार आहे, अशी माहिती वसंत मोरे यांनी दिली.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाशी युती करायची की नाही, याचा संपूर्ण निर्णय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील. शहरातील कार्यकर्त्यांना जरी भाजपाशी युती करण्याची भावना असली तरी राज ठाकरेच याविषयी निर्णय घेतील, असे वसंत मोरे म्हणाले. नऊ प्रभागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात मी चांगली संख्या आणेल. बाकी शहराची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते काय करतात, हे पाहावे लागेल, असे ते म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते वसंत मोरे यांची पुण्यात आज भेट झाली. एका लग्नसमारंभासाठी संजय राऊत पुण्यात असताना या दोघांची भेट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. नगरसेविका संगीत ठोसर यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने संजय राऊत आणि वसंत मोरे येथे आले होते. यावेळी त्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. संजय राऊत यांनी यावेळी वसंत मोरेंचे कौतुक केले.