पुणे : मनसे नेते (MNS) वसंत मोरे (Vasant More) यांच्या मेसेजला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रिप्लाय दिला आहे. सोमवारी सकाळी 11.30 वाजता वसंत मोरेंना राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर बोलावले आहे. सोमवारी सकाळी 7 वाजता मोरे पुण्याहून निघणार आहेत. दरम्यान, मोरेंना राज्यमंत्री बच्चू कडू यांचाही फोन आला होता. यावेळी आपण मनसेतच असून उद्या म्हणजेच सोमवारी राज ठाकरेंना भेटणार असल्याचे सांगितले आहे. वसंत मोरे गेल्या पाच सहा दिवसांपासून जास्तच चर्चेत आहेत. वसंत मोरे यांना पुणे मनसे अध्यक्षपदावरून हटवले असले, तरी त्यांनी मनसेत राहण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली आहे. मात्र त्यांना गेल्या पाच सहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांकडून ऑफर येत आहेत. अनेक नेत्यांनी तर वसंत मोरे आले तर त्यांचे स्वागत आहे, असे थेट बोलून दाखवले आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी तर त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. रुपाली पाटील यांनी मोरे राष्ट्रवादीत आल्यास त्यांचे कधीही स्वागत आहे. तसेच मोरेंनी आधीच हा निर्णय घेतला असता, तर आज मोरेंवर अध्यक्षपदावरून हटवले जाण्याची दुर्दैवी वेळ आली नसती, अशी तिखट प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे मोरेंना राष्ट्रवादी त्यांच्या पक्षात घेण्यास जोर लावताना दिसत आहे. त्यामुळे वसंत मोरे काय निर्णय घेणार? याकडेही अनेकांचं लक्ष लागले आहे.
वसंत मोरे यांच्या पक्षात येण्याने पालिका निवडणुकीत ताकद वाढणार आहे. हे अनेकांना माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे यांना आपल्या पक्षात खेचण्यास जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मी मनसेत राहण्यावर ठाम आहे, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे. राज साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, मला मनसे सोडायची इच्छा नाही, साईनाथ बाबर माझाच कार्यकर्ता आहे त्यामुळे तो अध्यक्ष झाला तरी मला काही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया वसंत मोरे यांनी दिली आहे.