पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आजपासून पुणे दौऱ्यावर आहेत. तर उद्या संध्याकाळी हनुमान मंदिरात (Hanuman Temple) राज ठाकरे महाआरती करणार आहेत. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरू आहे. मशिदीवरचे भोंगे काढावे अन्यथा त्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणार, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्या पुणे दौऱ्याची उत्सुकता आहे. राज ठाकरे यांनी नुकतीच ठाण्यात उत्तर सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीवर विशेषत: राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगे हटवण्याबाबत वक्तव्य केले होते. यानंतर मशिदीवरील भोंगे आणि मुस्लीम समाज यावरून राजकीय घमासान पहायला मिळाले होते. याला राज ठाकरे यांनी सभेत उत्तर दिले आहे.
खालकर चौकातील हनुमान मंदिरात ही महाआरती होणार आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी होत आहे. या चौकातील कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे. तर या कार्यक्रमाला राज्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी येणार असल्याची माहिती मिळत आहे. हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर मनसेतूनच याला विरोध होत होता. त्यामुळे काही कार्यकर्ते का. भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.
या कार्यक्रमादरम्यान कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांचीही तयारी आहे. वातावरण बिघडू नये, याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवर अनेक मुस्लीम कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे ते काय भूमिका घेतात, हेही यानिमित्ताने समोर येणार आहे.