पुणे : मी साहेबांच्या राजमार्गावरचा माणूस आहे. मी राजमार्गावरच आहे. त्यामुळे उशिरा का होईना मी आलो, अशी प्रतिक्रिया मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी दिली आहे. राज ठाकरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी आले तेव्हा वसंत मोरे दिसले नाहीत. ते गैरहजर होते. मात्र राज ठाकरे (Raj Thackeray) त्या ठिकाणाहून औरंगाबादच्या दिशेने असताना ते वढू येथे आले. मात्र चुकून गाड्यांचे मिस मॅच होत आहे. उशिरा मला फोन आल्यामुळे मला पोहोचणे शक्य झाले नाही, असे वसंत मोरे म्हणाले आहेत. सकाळी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आपल्या पुण्यातील निवासस्थानाहून औरंगाबादकडे निघाले. यावेळी निघण्यापूर्वी पुरोहित वर्गाचे आशीर्वाद त्यांनी घेतले. त्यानंतर औरंगाबादकडे रवाना झाले. वाटेत वढू याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी ते आले.
राज ठाकरेंच्या या गर्दीत नगरसेवक वसंत मोरे कुठेच पाहायला मिळाले नाहीत. परंतु राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाल्यानंतर मोरे वढू येथे पोहोचून त्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. सकाळपासून गाड्यांची मिसमॅच होत आहे. औरंगाबादला माझे नियोजन उद्या सकाळचे आहे. पण अचानक मला मेसेज आला, की आजच जायचे आहे. मात्र माझे दुसरे महत्त्वाचे काम आज आले. यात गैरसमज नकोत म्हणून याठिकाणी आल्याचे मोरे म्हणाले.
काही कार्यकर्ते वढूला आहेत. त्यामुळे आम्ही उद्या सकाळी औरंगाबादला जात आहोत. मी राज ठाकरेंच्या राजमार्गावरचा माणूस आहे. मी राजमार्गावरच आहे. उशिरा का होईना पोहोचलो, असे म्हणत उद्याच्या राज ठाकरेंच्या सभेलाही उपस्थित राहणार असल्याचे वसंत मोरे यावेळी म्हणाले. दरम्यान, औरंगाबादला सभेसाठी जाण्यासाठी नगरहून जाणार आहेत. त्यांचे अहमदनगर मनसेकडून छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या येथे स्वागत केले जाणार आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्त्यांचा मोठा ताफाही असेल, अशीही माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.