पुणे : पावसाचा अंदाज असूनही, पुणे येथील भारतीय हवामान विभागानुसार (India Meteorological Department) शहरातील दिवसाचे तापमान वाढत आहे. गुरुवारी पुण्यात दिवसाचे तापमान 32.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 4.8 अंश जास्त होते. बुधवारी तसेच पुण्यात दिवसाचे तापमान (Temperature) 31.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले जे सामान्यपेक्षा 4.5 अंश सेल्सिअस जास्त होते. गेल्या दोन दिवसांपासून शहरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही संध्याकाळी पुण्यात काही भागात पावसाने हजेरी लावली. सासवडसह काही ठिकाणी तर मुसळधार पाऊस बरसला. आयएमडीच्या अंदाजानुसार, राज्यात शनिवार आणि रविवारपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आयएमडी पुणे (Pune IMD) येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले, की 5 ऑगस्टपासून ते 9 ऑगस्टपर्यंत घाट माथ्याच्या क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे शहरात 9 ऑगस्टपर्यंत सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश आणि मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांमध्ये दिवसाचे तापमान 32 अंश सेल्सिअसवरून 26 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल, असे कश्यपी म्हणाले. ते पुढे म्हणाले, की महाराष्ट्रातील चारही उपविभागांमध्ये 6 ऑगस्टपासून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान विदर्भात मुसळधार पाऊस पडेल. ढगांचा गडगडाट तसेच विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यासाठी 4 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे कश्यपी म्हणाले.
तारीख – दिवसाचे तापमान – सामान्यपेक्षा जास्त (सरासरी)