पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. महाविकास आघाडी, शिवसेना आणि ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सडकून टीका केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी झालेल्या जातीय दंगली आणि मुस्लिम यांच्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यावरूनच आता संजय राऊत यांना भाजपकडून लक्ष्य केले जात आहे.
भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊत सध्या एमआयएममध्ये आहेत की मुस्लिम लीगमध्ये आहेत हेच समजत नाही.
त्यांची अवस्था म्हणजे काय होतास तू काय झालास तू अशी झाली आहे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. संजय राऊत यांच्यावर टीका केल्यामुळे आता भविष्यातही हा वाद आणखी उफाळून येणार असल्याचे दिसून येत आहे.
खासदार संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावरून त्यांना आता भाजपने घेरले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी पंधरा आमदारांच्या निकालावरूनही शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरले आहे. त्यामुळे हा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे.
राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी चर्चेत आले असतानाच आता मंत्रिमंडळाच्या विस्तारावरूनही राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री आणि आमचे वरिष्ठ नेते चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेतील असंही मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाऊन भेट घेतली.
त्यावेळी त्या भेटीत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होऊन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कशी आणि कोणत्या पद्धतीने लढवावी लागेल त्याविषयी त्यांनी चर्चा केली आहे.
मुंबई भेटीवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले असल्याने जे. पी. नड्डा यांच्या भाषणामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचेतना निर्माण झाली असल्याचे मतही गिरीश महाजन यांनी यावेळी व्यक्त केले आहे.