पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Way) पुन्हा एकदा अपघाताची घटना समोर आली आहे. कामशेत बोगद्यामध्ये भरधाव इनोव्हा कारचा टायर फुटला. त्यानंतर ट्रकला मागून धडकल्यामुळे गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर कारचालकासह दोघं जण जखमी झाले आहेत. (Mumbai Pune Express Way Innova Car Truck Accident killed two passengers)
भरधाव इनोव्हाचा टायर फुटला
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्यात हा भीषण अपघात झाला. खासगी कामानिमित्त घवले कुटुंब मुंबईवरुन पुण्याला जात होते. भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारचा पुढचा टायर फुटला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर कारने पुढे असलेल्या ट्रकच्या मागील बाजूला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की गाडीच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
अपघातात मुंबईतील जीएसटी डेप्युटी कमिशनर अभिजित रामलिंग घवले यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील त्यांचे नातेवाईक शंकरगोडा यत्नाल यांनाही अपघातात प्राण गमवावे लागले. तर गाडीचा चालक आणि अभिजित घवले यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एक्स्प्रेस वेवर अपघातांची मालिका
ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकला अपघात होऊन ट्रक चालकाला प्राण गमवावे लागले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे प्रवासात सातत्याने पाण्याची गरज लागते. ब्रेकजवळ ठेवलेली ‘जीवनदायी’ पाण्याची बाटलीच ट्रक चालकासाठी काळ ठरली. (Innova Car Truck Accident )
ट्रकचालकाचा जागीच मृत्यू
ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकल्यामुळे ट्रक चालकाला ब्रेक दाबण्यास अडथळा निर्माण झाला. त्यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाण्याच्या दिशेला बोरघाटात अंडा पॉईंटजवळ ट्रकला अपघात झाला. अपघातात ट्रक चालक दीपक वाघमारे (रा. लोणीकंद) याचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे फोटो-व्हिडीओ समोर आले आहेत.
अपघातग्रस्तांना वाचवणाऱ्या हातांवर काळाचा घाला
अपघातग्रस्त कारला मदत करण्यासाठी पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर थांबलेल्या पनवेल नगरसेवकाच्या मर्सिडीज कारला आयशर टेम्पोने मागून धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर नगरसेवक तेजस कांडपिले सुखरुप आहेत.आधी स्विफ्ट कारला कंटेनर ट्रेलरने धडक दिली होती. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी काही जण रस्त्याशेजारी थांबले, मात्र या देवदूतांच्या गाडीला आयशर टेम्पोने मागून धडक दिल्याने दोघा जणांना प्राण गमवावे लागले.
संबंधित बातम्या :
अपघातग्रस्त कारच्या मदतीला थांबलेल्या मर्सिडीजला धडक, दोघा देवदूतांचा मृत्यू, नगरसेवक सुखरुप
VIDEO | ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली अडकली, एक्स्प्रेस वेवर अपघात, ट्रकचालक ठार
(Mumbai Pune Express Way Innova Car Truck Accident killed two passengers)