पुणे: अखेर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. कसबापेठ विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. काँग्रेसनेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसने कसब्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत उमेदवारीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भाजपचे हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे रवींद्र धंगेकर असा सामना कसब्यातून पाहायला मिळणार आहे.
नाना पटोले यांनी ट्विट करून रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.
कसबा मतदारसंघाची जागा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे. उमदेवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे धंगेकर आजच हा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, रवींद्र धंगेकर यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याचं कालच नाना पटोले यांनी फोनवरून सांगितल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. काल रात्री नाना पटोलेंचा मला फोन आला. यावेळी त्यांनी तयारी करा, फॉर्म भरा असे आदेश दिले. त्यामुळे मी आज वरिष्ठाच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहे, असं धंगेकर यांनी सांगितलं.
धंगेकर यांनी केसरीवाड्यात जाऊन दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं. यावेळी रोहित टिळकही उपस्थित होते. यावेळी धंगेकर यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला हार घातला. मुक्ता टिळक यांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं.
यावेळी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मुक्ता टिळक या पुण्याच्या महापौर होत्या. मी नगरसेवक असताना त्यांच्यासोबत काम केलं आहे. प्रत्येक निवडणुकीत केसरीवाड्यात येऊन मी टिळकांचं दर्शन घेत असतो. त्याप्रमाणे आजही आलो आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजप उमेदवार हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील आहेत. यावेळी रासने यांनी दगडूशेठ हलवाई गणपती आणि कसबापेठ गणपतीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत भाजचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.