महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. अशात पुण्यात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पुण्यात आहेत. पुण्यातील मोदीबागेतील त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आले आहेत. याच भेटीगाठींदरम्यान अनेकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देत अनेकांनी तुतारी फुंकली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना पुरतं घेरण्याची तयारी केल्याचं दिसतंय. पुणे वडगाव शेरी मतदार संघात अजित पवार गटाला धक्का बसला आहे. माजी नगरसेवक रेखा टिंगरे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात 3 वेळा नगरसेवक होत्या. त्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केलाय.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक रेखा टिंगरे यांचा अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून धनकवडीचे माजी सरपंच बापूसाहेब धनकवडे यांचे नातू समीर धनकवडे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केलाय. हडपसर विधानसभा मतदारसंघातून दिलीप तुपे स्थायी समितीचे माजी चेअरमन आणि अनिल तुपे साधना बँक माजी चेअर यांनी भाजपामधून शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
अजित पवारांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईचे अजित पवार गटाचे पदाधिकारी, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस विलास माने, दिनकरराव तावडे, विजय देसाई यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खेड तालुका अद्यक्ष धीरज साबळे यांनी देखील आज शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
सुनील तटकरे यांना रायगड जिल्ह्यात धक्का बसला आहे. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्याम भोकरे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. श्याम भोकरे हे श्रीवर्धन मतदार संघातील पदाधिकारी आणि सुनील तटकरेंचे निकटवर्तीय आहेत. रायगड जिल्ह्यात गटबाजी निर्माण झाली. गट बाजूला कंटाळून आम्ही शरद पवार गटात प्रवेश केला. परवा मसाळामध्ये शरद पवारांची बैठक आहे. त्यावेळी देखील अनेक प्रवेश होणार आहेत. सुनील तटकरे प्रत्येकाला वचन देतात परंतु ते निभवत नाहीत. सगळे त्यांच्या घरात पद आहे ते स्वतः मंत्री आमदार, मुलगी आमदार, मुलगा आमदार पुतण्या आमदार भावा आमदार घराणेशाही सुरू आहे. एवढी पद घरात असल्यावर विकास होणारच आहे. आज आम्ही 50 लोकांनी प्रवेश केला, असं श्याम भोकरे म्हणालेत.
पर्वती विधानसभा मतदार संघांच्या उमेदवार अश्विनी कदम शरद पवार यांना भेटण्यासाठी मोदी बागेत आल्या आहेत. शरद पवार आज पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे, बापूसाहेब पठारे यांनी आज सकाळी त्यांची भेट घेतली.