पुणे | 24 जुलै 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं, अशी चर्चा सध्या सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. अर्थात या चर्चांना कारण ठरणाऱ्या घडामोडी राज्यात घडूनही गेल्या आहेत. महाविकास आघाडीची स्थापना ते शिवसेना पक्षात पडलेली फूट या घटना घडल्यानंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. याउलट या घटनेच्या वर्षभरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत येवून नव्या राजकारणाचा अध्याय सुरु केलाय. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या भूमिकेला विरोध केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या घडामोडींकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी होण्याच्या एक दिवस आधीच शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवार यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडलेला. असं असताना आता हे तीनही नेते एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे या मंचावर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा असण्याची शक्यता आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी होण्याआधी तीन ते चार दिवसआधीच नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जलसिंचन घोटाळा, शिखर बँक घोटाळा आणि इतर घोटाळ्यांचा आरोप करुन निशाणा साधला होता. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या टीकेला तेव्हा उत्तर दिलं होतं. पण मोदींच्या टीकेनंतर लगेच तीन-चार दिवसांनी राष्ट्रवादीचा अजित पवार यांचा गट महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आता हे चारही नेते एकाच मंचावर दिसण्याची चिन्हं आहेत.
नुकतंच आज विधान भवनाच्या कॉरिडोअरमध्ये आज एक अनोखी भेट घडून आली. शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांची भेट झाली. या नेत्यांनी एकमेकांची गळाभेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या होत्या. अतिशय खेळीमेळीचं वातावरण दोघांच्या चर्चेदरम्यान बघायला मिळालं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता आहे. तसेच टिळक स्मारक इथे लोकमान्य टिळक यांना देखील अभिवादन करण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्टला मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी दीपक टिळक यांच्या हस्ते त्यांना टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
यावेळी मेट्रो ते रामवाडी या मार्गावरील गरवारे ते रुबी हॉल या टप्प्याचे लोकार्पण देखील त्यांचा हस्ते होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी तयारी सुरू करण्यात आली असली तरी अद्याप पीएमओकडून अधिकृत दौरा मात्र कळवण्यात आला नाहीय.