पुणे | 28 ऑगस्ट 2023 : देशात पुढच्या वर्षी लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. तसेच राज्यातील अनेक शहारांमधील महापालिकांची देखील मुदत संपली आहे. त्यामुळे राज्यात महापालिका निवडणुकांचं देखील बिगूल वाजण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली सुरु आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सध्याची स्थिती वेगळी आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे निवडणुकीचा जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. आगामी निवडणुकांमध्ये एकाच पक्षाचे दोन गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीला आता दोन महिने पूर्ण होत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्याने कार्यकर्ते देखील संभ्रमात पडले आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा पक्ष एकसंघ करण्याच्या तयारीत लागले आहेत. उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाविरोधात शरद पवार यांचा गट आक्रमक झालाय. तर अजित पवार गटानेही संपूर्ण पक्षावर दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळात दोन्ही गटात तीव्र संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.
शरद पवार गटाकडून राज्यात ठिकठिकाणी सभा घेतल्या जात आहेत. तर अजित पवार गटाकडून या सभांना उत्तर देण्यासाठी सभा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे दोन्ही गटातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. असं असताना शरद पवार यांच्याकडून आगामी निवडणुकांसाठी तयारी केली जात आहे. शरद पवार यांनी याबाबत कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना देखील दिल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप विरोधात लढा सुरु ठेवा, अशा सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत. पुण्यातील लोकायत प्रशिक्षण शिबिरात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या.आगामी निवडणुकींच्या तयारीला लागा, अशा सूचना शरद पवारांनी केल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून रविवारी पुण्यात लोकायत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसाठी हे प्रशिक्षण शिबिर होतं. या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून शरद पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला आहे. आगामी काळ हा निवडणुकांचा असणार आहे, त्यामुळे या निवडणुकांसाठी कामाला लागा आणि सज्ज राहण्याची सूचना शरद पवारांनी दिली आहे.