सुप्रिया सुळे यांना धक्का, लेटरबॉम्ब टाकणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा उद्या भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: May 15, 2023 | 10:26 AM

राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार आणि पुरंदरमधील मोठं नाव असलेले अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

सुप्रिया सुळे यांना धक्का, लेटरबॉम्ब टाकणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा उद्या भाजपमध्ये प्रवेश
bjp flag
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुरंदर : कर्नाटकातील विजयानंतर महाविकास आघाडीत जल्लोष करण्यात येत आहे. मात्र, आघाडीच्या खासकरून राष्ट्रवादीच्या या जल्लोषावर पाणी फेरणारी एक धक्कादायक बातमी आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे सहकारी अशोक टेकवडे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. टेकवडे हे पुरंदरमधील मोठं नाव आहे. त्यांनी राष्ट्रवादीला राम राम केल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे पुरंदरमधील राजकीय गणितच बदलणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक टेकवडे हे सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय होते. त्यांनीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मिशन बारामती सुरू

अशोक टेकवडे गेल्या महिन्यांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असं वाटत नव्हतं. आज ना उद्या ते पक्ष सोडतील अशी पुरंदरमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती. अखेर या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठं बळ मिळणार आहे. भाजपने मिशन बारामती सुरू केलं आहे. बारामतीत पवार कुटुंबाला तगडं आव्हान निर्माण करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. या मिशन बारामतीचा भाग म्हणूनच टेकवडे यांनाही पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार असल्याचे संकेत आहे.

ashok tekawade

आधी लेटर बॉम्ब

अशोक टेकवडे हे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. तशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यांनी गेल्या महिन्यात लेटर बॉम्ब टाकून खळबळ उडवून दिली होती. टेकवडे यांनी जिल्हाध्यक्षांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी पुरंदर तालुकाध्यक्षांची तक्रार केली होती. तालुकाध्यक्षांवर टेकवडे यांनी या पत्रातून गंभीर आरोप केले होते. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणीही केली होती. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष राहिला नाही. तो पदाधिकाऱ्यांचा पक्ष झाला आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती. मात्र, या पत्रावर काहीच कारवाई न झाल्याने टेकवडे दुखावले गेले होते. त्या नाराजीतूनच त्यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.