पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासारखे असंवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजवर पाहिले नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते रवीकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यत शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री बंडखोरांच्या मतदारसंघात स्वागत समारंभ, मेळावे, हार-तुरे घेण्यासाठी जात आहेत, असा हल्लाबोल वरपे यांनी केला आहे. राज्यातील शेतकरी सध्या अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना (Farmers) आधार देणे गरजेचे आहे, त्यांना मदत देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अडचणी समजून घेणे अपेक्षित आहे. मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक, मालेगाव, औरंगाबाद अशा बंडखोरांच्या मतदारसंघात स्वागत समारंभ, मेळावे, हार-तुरे घेण्यात मग्न आहेत, असे टीकास्त्र रवीकांत वरपेंनी सोडले. यावेळी त्यांनी नुकसानीची आकडेवारीसह माहिती दिली.
आज महराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे 10 लाख हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 60 हजार हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतजमीन खरडून गेली आहे. अशातच राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार विदर्भ, मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर गेले आहेत. तेथील शेतकाऱ्यांच्या समस्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचा आढावा ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेत आहेत, असे वरपे म्हणाले.
अजित पवार अशाप्रकारे दौरे काढत असताना भाजपाच्या नेत्यांनी अजित पवारांवर वरतीमागून घोडे अशी टीका केली आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकारची वरात जनता काढल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री सत्कार, समारंभ, मेळाव्यात व्यस्त आहात. हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य म्हणावे लागेल, असा टोला युवक राष्ट्रवादीचे रविकांत वरपे यांनी लगावला आहे. दरम्यान, अजित पवार यांनी राज्यातील विविध ठिकाणी नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. याच चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. वरपे यांनी याविषयीची माहिती दिली. राज्यात सरकारकडून अतिवृष्टीची घोषणा त्याचबरोबर मदत अद्यापही जाहीर झालेली नाही, पंचनामे झालेले नाहीत. यावरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत.