लोकसभा निवडणुकीचा निकाल हा भाजपला धक्का देणारा ठरला. यात भाजपला अपेक्षित यश आलं नाही. तर इंडिया आघाडीने उसंडी मारल्याचं दिसलं. यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. यंदा 300 चा आकडा 240 वर आला. 60 जागा कमी झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये लोकांनी वेगळा कौल दिला. मला असं वाटत होतं की, देशात राम मंदिर झाल्यानंतर निवडणुकीचा प्रचार त्यानुसार होईल आणि उत्तर प्रदेशचे जनता मतदान करेल. मंदिराच्या नावावर मतदान मागितलं. म्हणून लोकांनी वेगळा निकाल दिला. मंदिर अयोध्येत बांधलं पण तिथंच भाजपचा उमेदवार पडला. देशाची लोकशाही माणसांच्या शहाणपणामुळे टिकली आहे, असं शरद पवार म्हणाले. ते बारामतीत बोलत होते.
लोकसभा निवडणूक आता झाली आहे,आणि आता ही निवडणूक झाल्यानंतर राज्यातील जनतेचे आभार मानले पाहिजे. त्यांनी वेगळा निकाल दिला. देशात देखील वेगळा निकाल आला. गेली 10 वर्ष सत्ता मोदी साहेबांकडे आहे आणि त्याचा परिणाम या निकालात दिसला. वेगळा निकाल लागला. सरकार बनलं, मंत्रिमंडळ स्थापन झालं आता अशी अपेक्षा करू की देशात आता स्थिरता येईल, त्याची देशाला गरज आहे. निवडणूक येयील आणि जातील देश आर्थिक मजबूत झाला आहे, असं शरद पवार म्हणाले.
आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे. मी कालपासून बारामतीमध्ये आहे आणि या तीन दिवसांत मी अनेक ठिकाणी जाणार आहे. त्याचा उद्देश आहे की दुष्काळी दौरा आहे माझा एक अनुभव आहे. मी ज्यावेळी दुष्काळी दौऱ्याला निघतो. त्यावेळी पाऊस सुरू होतो आणि आजही पाऊस झाला, असं म्हणत शरद पवार यांनी दुष्काळी दौऱ्याची घोषणा केली आहे.
यंदा राज्यात आणि देशात चांगला पाऊस होणार आहे. राज्यात साखरेच उत्पन्न दोन नंबरला राहतं. पण यंदा आपलं राज्य एक नंबरला गेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये यंदा साखरेच उत्पन्न कमी झालं आहे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.