लोकसभा निवडणूक नुकतीच संपली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना झाला. महाराष्ट्रात तर नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी शरद पवार यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येत शरद पवारांवर वैयक्तिक टीका केला. या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात मोदी विरूद्ध पवार असा थेट सामना पाहायला मिळाला. मात्र लोकसभा निवडणूक संपताच शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चेची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या शिवाय लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही शरद पवारांनी भाष्य केलं. बारामतीत स्थानिकांशी संवाद साधताना शरद पवारांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.
निवडणुकीत टीका टिप्पणी होत असते. माझ्यावर वैयक्तिक टीका केली गेली. नरेंद्र मोदीदेखील माझ्यावर बोलले. पण जे झालं ते झालं… आता विकासासाठी या सगळ्या मंडळींशी चर्चा करायला मी तयार आहे. मात्र यात राजकरण आणणार नाही हा शब्द आहे, असं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या विधानाची चर्चा होतेय.
राज्यकार्त्यांनी शहाणपणा दाखवला पाहिजे. केंद्र सरकारने साखरेची निर्यात थांबवली आहे. राज्यात आज साखरेचा प्रचंड साठा आहे. मी सरकारशी चर्चा केली आणि सांगितलं की अशी निर्बंध आणू नका. तर मला त्यांनी संगितलं की लोकसभा निवडणुक होईपर्यंत आम्ही तुमच ऐकणार नाहीय आता दिल्लीत गेल्यावर हा विषय मी मांडणार आहे बघू ऐकतात का… यांनी इथेनॉल ला देखील बंदी घातली आहे हे चुकीचं आहे, असंही शरद पवार म्हणाले.
संजय गेली दहा वर्ष टोकाची भूमिका घेत होते. आता जनतेने संदेश दिला की तुमचे पाय खाली ठेवा. नरेंद्र मोदींनी सरकार बनवलं. पण त्यांना चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागली. सरकार स्थिर राहील अशी अपेक्षा आहे, असंही शरद पवार म्हणाले.