महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची काल घोषणा झाली. त्यानंतर आज बारामतीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाचा आज 52 व्या वर्धापन दिन आहे. या निमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शरद पवार, युगेंद्र पवार, सुनेत्रा पवार एका मंचावर दिसले. या कार्यक्रमाला उपस्थितांना शरद पवारांनी संबोधित केलं. 52 वर्षांपूर्वी लावलेलं ‘विद्या प्रतिष्ठान’ नावाचं रोपटं आज या ठिकाणी पोहोचलं आहे, असं शरद पवार म्हणाले.
विद्या प्रतिष्ठानचा हा यंदा 52 व वर्धापनदिन आहे. याअगोदर इंग्रजी शिक्षणाची सोय बारामतीत नव्हती. त्यामुळे आम्हा लोकांना ही गोष्ट अस्वस्थ करत होती. म्हणून आम्ही ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. बारामतीचा एक लौकिक वेगळा होता. पेशव्यांच्या अखेरच्या टप्प्यात त्यांचा बारामतीशी संबंध आला. पेशवे जेव्हा आपले सैन्य मोहिमेला पाठवायचे. त्या अगोदर बाबूजीराव नाईक यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊन मग मोहिमेला सैन्य रवाना झाले. स्वातंत्र चळवळीसाठी बारामती मधील युवकांचे योगदान मोठे आहे. शैक्षणिक केंद्र म्हणून बारामतीचा नावलौकिक झाला त्याचे संपूर्ण श्रेय विद्या प्रतिष्ठानला द्यावे लागेल, असं शरद पवार म्हणाले.
बारामतीतील विकासावर शरद पवार यांनी भाष्य केलं. विद्या प्रतिष्ठानने शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. 52 वर्षांपूर्वी लावलेलं रोपटं हे एवढया मोठ्या ठिकाणी पोहोचले आहे. दर्जेदार शिक्षण आता बारामतीमधून युवक युवतींना मिळत आहे. बारामती औद्योगिक क्षेत्रातील हब बनत चालली आहे, असं म्हणत शरद पवार यांनी बारामतीच्या विकासावर भाष्य केलं आहे.
साखर कारखानादारी मोठ्या प्रमाणावर बारामतीत सुरू झालेली आहे. राज्याला अभिमान वाटावा,अशी पिढी निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. देशाचे राष्ट्रपती,पंतप्रधान, अर्थशास्त्रज्ञ, आणि नामांकित लोक या ठिकाणी येऊन गेले. युवक युवतींना मार्गदर्शन केले, असं शरद पवार म्हणाले.