शरद पवारांनी ‘दिवटा’ म्हणताच सुनील टिंगरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पवारसाहेबांना…

| Updated on: Sep 28, 2024 | 8:43 AM

MLA Sunil Tingre on Sharad Pawar Statement : शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनील टिंगरे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

शरद पवारांनी दिवटा म्हणताच सुनील टिंगरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पवारसाहेबांना...
शरद पवार, सुनिल टिंगरे
Image Credit source: Facebook
Follow us on

पुण्यातील खराडीमध्ये शरद पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर सडकून टीका केली. पवारांनी सुनील टिंगरे यांचा ‘दिवटा’ असा उल्लेख केला. तसंच पोर्शे कार अपघात प्रकरणाचा दाखलाही शरद पवार यांनी या भाषणात दिला. त्यांच्या या टीकेनंतर सुनील टिंगरे यांनी टीव्ही 9 मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या या टीकेवर सुनील टिंगरे यांनी उत्तर दिलं. शरद पवार माझ्यासाठी कालही आदरणीय होते, आज ही आहेत आणि उद्याही राहतील. त्यांना माझा कान पकडायचा अधिकार आहे. मी त्यांना प्रत्युत्तर देणं योग्या नाही. मला ते शोभत नाही, असं सुनील टिंगरे म्हणालेत.

पुण्यातील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी शरद पवारांनी केलेल्या भाषणात त्यांनी सुनील टिंगरे यांच्यावर टीका केली.

शरद पवार काय म्हणाले होते?

खराडीमध्ये झालेल्या सभेत शरद पवार यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार टीका केली. रांजणगावला गेल्यावर जसं गणपतीचं दर्शन होतं. तसं उद्योगांचंही दर्शन होतं. पुण्यात आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी काय केलं? पुण्याची चौकशी केली तर लोक काय सांगतात? कोयता गँग…., असं शरद पवार म्हणाले.

सुनील टिंगरेंचे कान धरले

अलीकडची पिढी काय खाते माहिती नाही. कसल्या तरी गोळ्या खातात. त्या गोळ्या खाल्ल्या की चंद्रावर जातात. सत्ताधारी काय करतात? हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. आमचे आमदार दमदार आमदार…. हा आमदार दमदार आहे? त्याचं नाव काय टिंगरे…. तो कुणाच्या तिकिटावर निवडून आला? त्यावेळी पक्षाचा नेता कोण होता? पक्षाची स्थापना कोणी केली? तुझा काय बंदोबस्त करायचा हे लोक करतील. चुकीच्या गोष्टींना पाठिंबा देवू नकोस. एका बिल्डराच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोन मुलांना उडवलं. अशा वेळी हा दिवटा आमदार पोलीस स्टेशनला जातो. याच्यासाठी मते मागितली का? शरद पवारच्या नावाने मते मागितली, श्रद्धेने मते दिली. त्याचं तुम्ही असं उत्तर दायित्व केलं?, असं म्हणत शरद पवार यांनी सुनील टिंगरे यांचे कान धरले. पवारांच्या या टीकेला आता टिंगरेंनीही उत्तर दिलं आहे.