पुणे : प्रत्येक पक्षाला वाटणे, की आपला मुख्यमंत्री व्हावा यात गैर काय, असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supruya Sule) यांनी विचारला आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या राज्यात विविध वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. त्यावर त्यांना विचारले असता त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे आमदार संजय जगताप यांच्या विशेष निधीतून फुरसूंगी गावाला 8 कोटी 65 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन समारंभानिमित्त त्या आल्या असता बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की आता वास्तवतेत जगू या. आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री आहेत. महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. सगळ्यांना वाटते की आपला मुख्यमंत्री व्हावा. माझे म्हणणे आहे, ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात. आपले महाविकास आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदाच्या मागे लागू नये. जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) म्हणून काम करत आहोत. कामात सातत्य पाहायला मिळत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा झाल्यास संपूर्ण मंत्रीमंडळासह तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणार, असा नवस त्यांनी तुळजापुरात केला होता. राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. भवानीमातेच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असे त्या म्हणाल्या होत्या.
महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते स्वतः पुढाकार घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. महाविकास आघाडीचा मनाचा हा मोठपणा आहे, की ते स्वत: गेले. मात्र घोडेबाजार वगैरेसारख्या गोष्टी कानावर येतायेत हे दुर्दैव आहे, असे त्या म्हणाल्या. हे महाराष्ट्राला न शोभणारे नाही. दोन दशकानंतर ही निवडणूक होत आहे. कोणत्याही राज्याच्या राजकारणासाठी हे हिताचे नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही ईडीचे समन्स आले आहे, त्यावर त्या म्हणाल्या, की मला काय आश्चर्य वाटत नाही. केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे. ज्या महिलेने देशाची एवढी वर्ष सेवा केली. त्यांना आता कोरोनाही झाला आहे. मात्र त्यातही केंद्र सरकार अशाप्रकारच्या नोटीस पाठवून राजकारण करत आहे. ही नवीन पद्धत भाजपाच्या लोकांनी सुरू केली आहे. हे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी भाजपावर केली.