पुणे : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन तेथील स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांचं गेल्या पाच वर्षांपासून वर्चस्व होतं. त्यांच्या या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात होते. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले जात होते. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं.
विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रचारसभेआधी विरोधकांनी त्यांच्या सभेस्थळी लावलेल्या पोस्टर्समुळे मोठा तणाव समोर आला होता. पण या सगळ्या गदारोळानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचाच विजय झालाय.
घोडगांगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने या निवडणुकीत किसान क्रांती पॅनेलवर 20-1 असा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांचे या कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व कायम राहीलं आहे.
या निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभा झाल्या होत्या.