पुणे : बोट (Boat) दाखवेल तेथे बोटसेवा सुरू झालीच पाहिजे, अशी मागणी करत राष्ट्रवादी पुणे शहराच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पुण्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) शहर तुंबले होते. त्यामुळे भाजपाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने आज महापालिका भवनाच्या बाहेर तीव्र आंदोलन केले आहे. यावेळी खरीखुरी बोट राष्ट्रवादीने आणली होती. पुढील काळात सार्वजनिक वाहतुकीसाठी बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली. पुणेकरांना खड्ड्यांत घालणाऱ्या भाजपाचा निषेध असो, पुणेकरांना पाण्यात बुडवणाऱ्या भाजपाचा धिक्कार असो, भाजपाचे करायचे काय – खाली डोके वर पाय, अशाप्रकारची घोषणाबाजी राष्ट्रवादीतर्फे यावेळी करण्यात आली. खरी बोट आणून यावेळी भाजपाचा निषेध करत हे आंदोलन (NCP protest) करण्यात आले आहे.
रविवारी संध्याकाळी पुण्यात मुसळधार पाऊस झाला होता. संध्याकाळच्या वेळी दाट काळे ढग आणि त्यानंतर गडगडाट तसेच विजांचा कडकडाट होत मुसळधार पाऊस झाला. यामुळे नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली होती. या पावसानंतर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. काही ठिकाणी तर दुचाकीदेखील वाहून गेल्याचे प्रकार घडले. पाषाण, पंचवटी, स्टेट बँक नगर येथे पहाटे दोन चारचाकी वाहनांवर झाड कोसळले होते. अग्निशामन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत ते झाड बाजूला केले. हडपसरमधील भाजी मंडईतही पाणीच पाणी झाले होते. तर लोहगाव, धानोरी आणि इतर काही ठिकाणच्या नागरिकांच्या घरात, सोसायट्यांत पाणी शिरले होते.
पुण्यात पाऊस आणि त्यानंतर झालेल्या गैरसोयीनंतर राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. टेंडरची मलई खाण्यातच भाजपा गुंतले असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. तर आतापर्यंत राष्ट्रवादीचीच सत्ता होती, असा पलटवार भाजपाने केला. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीने चक्क महापालिका भवनासमोर खरीखुरी बोट आणत भाजपाचा निषेध केला. बोटीत राष्ट्रवादीचे पुण्यातले नेते प्रदीप देशमुख बसले होते. तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी जमत आंदोलन केले.