पुणे : पुणेकरांना पर्यटनासाठी आता बाहेर जाण्याची गरज नाही. पुणे महापालिकेने शहरातील खड्ड्यांतच पुणेकरांसाठी पर्यटन सुरू केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP Protest) केला आहे. पुण्यातील खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आज स्वारगेट (Swargate) येथे आंदोलन केले. खड्डेमुक्त पुण्यासाठी आंदोलन करताना राष्ट्रवादीने तत्कालीन भाजपा सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. ज्या खड्ड्यांत पावसामुळे पाणी साचले आहे, त्या पाण्यात राष्ट्रवादीने कागदी बोट, प्लास्टिकचे मासे आणि प्लास्टिकचे बदक सोडत आंदोलन केले तसेच घोषणाबाजी केली. पुण्याला खड्ड्यात (Potholes) घालणाऱ्या भाजपाचा निषेध असो, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. या खड्ड्यांमुळे पुढच्या काळात खरी बदके, होड्या सोडाव्या लागतील, असा टोलाही भाजपाला लगावण्यात आला.
पाच वर्षे भाजपाने केवळ महापालिकेत भ्रष्टाचार केला. त्याचमुळे शहरातील रस्त्यांची ही चाळण झाली आहे. तसेच महापालिकेने जो 90% खड्डे बुजवले असल्याचा दावा केला आहे तो दावासुद्धा खोटा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी म्हटले आहे. 2017 ते 22 याकाळात महापालिकेत पूर्ण बहुमताने भाजपाची सत्ता होती. मागील चार महिन्यात प्रशासक आहे. मात्र हे पाप भाजपाचे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. भ्रष्टाचार, ठेकेदार आणि अधिकारी आणि नगरसेवकांची युती झाली. त्याचा परिणाम म्हणून शहरात आज विविध ठिकाणी खड्डे दिसत आहेत. खड्डे चुकवताना अनेकांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असा आरोप जगताप यांनी केला.
स्वारगेटसारख्या गर्दीच्या ठिकाणच्या चौकात साचलेल्या खड्ड्यांमधील पाण्यात आम्हाला मासे आणि बदके सोडावी लागत आहेत. पुणेकरांच्या दृष्टीने ही शरमेची बाब आहे. महानगरपालिकेचा पाच वर्षांचा कारभार कसा भ्रष्टाचारयुक्त होता, हेच दर्शवत आहे. पुणेकरांनी आता भाजपामुक्त पुणे करावे, तरच चांगले रस्ते मिळतील. भाजपाची पाच वर्षे खड्डे देणारी सत्ता होती, अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली. पुणेकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.