पुणे : अरे काय ते सिलेंडर, काय ती महागाई आणि काय ते भाजपा सरकार म्हणत राष्ट्रवादीने पुण्यात आंदोलन (NCP protest) केले. काही दिवसांपूर्वी भारतामधील तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्यानंतर काल पुन्हा सर्वसामान्य नागरिकांना महागाईची (Inflation) झळ बसली आहे. कालपासून घरगुती गॅस सिलेंडरचे (Gas Cylinder) दर 50 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. याच महागाई विरोधात पुण्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसने आज भर पावसात मोदी सरकार विरोधात आंदोलन केले. या आंदोलनात शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा गाजलेला डायलॉग वापरत भाजपा सरकारवर टीका करण्यात आली. या आंदोलन करणाऱ्या महिलांनी मोदी सरकारला टार्गेट केले. नरेंद्र मोदींना अर्थकारण कळत नाही, कारण त्यांना घरी सांगायलाच कोणी नाही, असा टोलाही यावेळी लगावण्यात आला.
शहर राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नगोडे म्हणाल्या, की मागील आठ वर्षांपूर्वी गॅसचा दर 400 रुपये होता. मात्र भाजपा सरकार आल्यानंतर गॅस सिलिंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत राहिली. आज गॅस सिलिंडर 1053 रुपयांवर पोहोचला आहे. 50 रुपयांची वाढ सरकारने केली आहे. हजारपेक्षा अधिकचा हा दर आणि त्याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना पडत आहे. आम्ही सातत्याने या किंमती कमी करण्याची मागणी करत आहोत. केंद्रात भाजपा जेव्हा विरोधी पक्षात होते, त्यावेळी थोडी दरवाढ झाली, की भाजपा आंदोलने करीत होती, आता मात्र कोणीही बोलायला तयार नाही.
स्मृती इराणी आणि खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना विनंती आहे, की तुम्हीही घर चालवता. सगळे अर्थकारण जाणता. मोदींना अर्थकारण कळत नाही, कारण घरात त्यांना सांगायलाच कोणी नाही. त्यामुळे आम्ही विनंती नाही, तर मागणी करत आहोत, असे नगोडे म्हणाल्या. मागील दहा दिवसांत राज्यात काय परिस्थिती आहे, आमदारांचे रेट काय फुटले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. साधारण 50 कोटी आमच्या कानी आले आहे. त्यामुळे 50 रुपये गुणिले किती रुपये म्हणजे या सर्वांची वसुली सामान्य नागरिकांकडून करत आहे काय, असा सवाल त्यांनी केला.