पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उद्याचा कार्यक्रम म्हणजे मनसेला हे उत्तर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जात, धर्म मानत नाही. सध्या रमजान सुरू आहे. तर उद्या हनुमान जयंती (Hanuman Jayanti) हा योग जुळून आला आहे, असे राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) म्हणाल्या आहेत. मनसेचा हनुमान चालिसा आणि महाआरतीचा उद्या राज ठाकरेंच्या हस्ते कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे मुस्लीम बांधवांच्या हस्ते हनुमान आरती होणार आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, की राज ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यांवर बोलले पाहिजे. मात्र भाजपा त्यांच्याकडून हे करून घेत आहे. दुसरीकडे 3 मेचा जो अल्टीमेटम दिला आहे, त्यावर राज्याच्या गृहविभागाने स्पष्टीकरण दिले आहे. जो कोणी कायदा हातात घेईल, त्यावर कारवाई होणार आहे, असा टोला यावेळी रुपाली पाटलांनी मनसेला लगावला आहे.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील हे मुस्लीम बांधवांच्या हस्ते हनुमान आरती करणार आहेत. साखळीपीर हनुमान मंदिरात हा कार्यक्रम होणार आहे. इफ्तार पार्टीचे आयोजन याठिकाणी करण्यात आले आहे. दरम्यान अशाप्रकारचे आयोजन 1987पासून होत असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. शहरात एकोपा राहावा, शांतता सर्वत्र राहावी, हाच यामागे उद्देश असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
शिवानी माळवदकर म्हणाल्या, की हिंदू-मुस्लीम समभावाचा संदेश देणारा हा उपक्रम आहे. यामागचा इतिहासही त्यांनी यावेळी सांगितला. पवित्र रमजान महिना, गणपती उत्सव, नैवेद्य तसेच रोजा आणि इफ्तार या सर्वांचा इतिहास त्यांनी यावेळी सांगितला. तर रवींद्र माळवदकर म्हणाले, की मनसेला उत्तर म्हणून नाही, तर धर्मवादी, जातीयवादी होण्यापेक्षा राष्ट्रवादी होण्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.