पुणे / अभिजीत पोते : छत्रपती संभाजी नगरनंतर आता पुण्यात एका रॅप सॉंगवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुटिंग केलेले रॅप साँग वादाच्या भोवऱ्यात आले आहे. रॅप साँगमध्ये आक्षेपार्ह शब्द असल्याने यावर आक्षेप घेण्यात आला आहे. शिव्यांचा भडीमार असलेल्या गाण्यासाठी विद्यापीठाने परवानगी कशी दिली, याचा खुलासा करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आकाश झांबरे यांनी ही मागणी केली आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना कुलगुरूंना भेटण्यासाठी मोठे अडथळे येतात. सुरक्षा व्यवस्था कडक असताना ही थेट विद्यापीठाच्या आवारातच अशा प्रकारची शूटिंग करण्यात आल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
सल्तनत नावाचे साँग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत आणि अंतर्गत भागात चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात दारु, बंदूक, तलवार अशा साहित्याचा वापर या रॅप साँगमध्ये करण्यात आला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी या गाण्यावर आक्षेप घेत, कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीबाबत काय कारवाई होतेय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी शिंदे गटाच्या विरोधात रॅप सॉंग बनवल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये वाद निर्माण झाला होता. शिंदे गटाच्या गद्दारीवर राम मुंगसे या तरुणाने रॅप सॉंग बनवले होते. रॅप साँग व्हायरल झाल्यानंतर दोन दिवसांनी तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. तरुणाच्या अटकेनंतर आम्ही सर्व तरुणाच्या पाठीशी असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सांगितले होते.