पुणे | 7 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता पक्ष बांधणीवर भर दिला आहे. शरद पवार यांनी राज्यातील जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये सभा घेण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जात आहे. कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची ही मोर्चेबांधणी सुरू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी मजबूत करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. ही सर्व तयारी सुरू असतानाच शरद पवार यांनी आमदार आणि खासदारांना तातडीने मुंबईत बोलावलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी येत्या 9 सप्टेंबर रोजी मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या सर्व विद्यमान आमदार आणि खासदारांना बोलावण्यात आलं आहे. याशिवाय माजी आमदार, माजी खासदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनाही बैठकीचं निमंत्रण देण्यात आालं आहे. स्वत: शरद पवार या बैठकीला संबोधित करणार आहेत. शरद पवार यांनी अचानक तातडीने बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
शरद पवार या बैठकीत आमदार आणि खासदारांच्या कामकाजांचा आणि त्यांच्या मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. माजी आमदार आणि माजी खासदारांच्या मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत. तसेच लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला संबोधित करणार आहेत.
इंडिया आघाडीने शरद पवार यांना समन्वय समितीत घेतले आहेत. त्यामुळे पवारांवर मोठी जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे. शरद पवार कामाचे वाटप करून देश पातळीवर लक्ष घालण्याची शक्यताही आहे. शिवाय राज्यातही जास्तीत जास्त सभा घेण्याचं नियोजन केलं जाणार असल्याची शक्यता आहे.
शरद पवार ज्या ज्या ठिकाणी सभा घेतात त्या ठिकाणी अजितदादा गटाकडून उत्तर सभा घेतली जात आहे. शरद पवार यांनी घेतलेल्या सभेच्या ठिकाणी दुप्पट शक्तीप्रदर्शन करून पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.