पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर (Katraj doodh sangh election) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकत दूध संघावर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. सर्व जागा राष्ट्रवादीने जिंकल्या आहेत. यामध्ये विद्यमान अध्यक्ष विष्णू हिंगे आणि विद्यमान उपाध्यक्षांचे पती कालिदास गोपाळघरे विजयी झाले आहेत. जिल्हा दूध संघासाठी रविवारी (दि. 20) मतदान (Voting) झाले आणि सोमवारी (दि. 21) सकाळी मतमोजणी झाली. कात्रज मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी ही मतमोजणी केली. जिल्हा दूध संघातील 16 पैकी 5 संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत.
गोपाळराव म्हस्के (हवेली), भगवान पासलकर (वेल्हे), राहुल दिवेकर (दौंड) आणि अनुसूचित जाती-जमाती गटामधून चंद्रकांत भिंगारे हे चार राष्ट्रवादीचे संचालक आहेत. पुरंदरमधून बिनविरोध निवडून आलेले मारुती जगताप हे काँग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनासुद्धा सहकार पॅनेलने पुरस्कृत केले होते. तर 11 जागांसाठी 25 उमेदवार रिंगणात होते. भोरमधून विजयी झालेले अपक्ष उमेदवार दिलीप थोपटे वगळता राष्ट्रवादीकडून घोषित सहकार पॅनेलने सर्व जागा जिंकल्या आहेत.