पुणे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP youth congress) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या विरोधात पुणे पोलिसांत (Pune Police) तक्रार दाखल केली आहे. चित्रा वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर पीडितेला पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. चित्रा वाघ यांनी पीडितेला रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात खोटा जबाब नोंदवण्यास भाग पाडल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणीने आपली तक्रार मागे घेतली. तसेच चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले, असे तरुणीने म्हटले होते. त्यानंतर चित्रा वाघ यांनीही स्पष्टीकरण देत आपण पीडितेची मदत केली ही चूक केली काय, असा सवालही केला होता.
पीडित तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधातील तक्रार मागे घेत असल्याचे म्हटले होते. शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या विरोधातील केस मी मागे घेणार आहे. तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर कुठलाही दबाब नाही. माझ्यासोबत जे घडले आहे ते खरे आहे. मात्र मला, माझ्या कुटुंबीयांना धोका असल्यामुळे मी केस मागे घेत आहे. या प्रकरणाचा राजकीय फायदा घेतला जात असल्याचा पीडित तरुणीने आरोप केला आहे. तर चित्रा वाघ यांच्याविरोधात अद्याप तक्रार दिली नाही, असेही या तरुणीने म्हटले आहे.
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच त्या तरुणीचे माझ्याकडे मेसेजेस आहेत. पोलिसांनी माझा सीडीआर काढावा, त्या तरुणीने जी माहिती मला दिली. त्यावरून ती एकटी लढतेय. तिच्यावर अत्याचार होतोय, म्हणून मी तिच्या सोबत उभी राहिली. आणि आता हे माझ्यावर असे आरोप करत आहेत. मात्र मी गप्प बसणार नाही. माझे काम सुरूच राहणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.