पुणे : अंबादास दानवे (Ambadas Danve) झंझावातासारखे काम करत आहेत. राजधर्म पाळा, असे नरेंद्र मोदींना अटलजींनी सांगितले होते. मोदींना जबाबदारी तशीच ठेवा, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र एवढ्या लवकर तुम्ही इतिहास विसरलात, अशी खंत शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे नीलम गोऱ्हे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनाला आले होते. यावेळी गोऱ्हे यांनी दानवेंचे कौतुक केले तर भाजपावर (BJP) टीका केली. त्या म्हणाल्या, की आम्हाला कोणाच्या दयेची आणि कृपेची गरज नाही. जनतेच्या दरबारात जे काय होईल ते होईल. त्याच्या आधीच कोणी दर्पोक्ती कोणी करू नये. यावेळी अंबादास दानवे यांनीही भाजपावर टीका केली. अनेक लोकांना धमकावले जात आहे. याची माहिती माझ्याकडे आहे, असा आरोप त्यांनी केला.
दानवे म्हणाले, की विरोधीपक्ष नेता झाल्यानंतर पहिल्यांदा नीलम ताईंना भेटायला आलो आहे. मागच्या महिन्यात उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला केला, असा आरोप करण्यात आला होता. काही पुरावे नसताना रात्री गुन्हे दाखल केले होते. मात्र अशा दडपशाहीला आम्ही घाबरत नाहीत, असे ते म्हणाले.
अमित शाहांसारख्या माणसाला इथे येऊन बाजू मांडावी लागते, मुंबई महापालिकेच्या तयारीसाठी देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेतत्वाला यावे लागते. यातच शिवसेनेचा विजय आहे. राज्यातल्या नेतृत्वात तेवढी धमक नाही, त्यामुळेच अमित शाहांना यावे लागत आहे. अमित शाहांना खरी शिवसेना कोण आहे हे चांगल माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
मोदींचा करिष्मा असतानाही शिवसेनेने विजय मिळवला होता. यावेळेस पण देदीप्यमान असा शिवसेनेचा विजय असेल. सगळ्या गोष्टी यांना अहमदाबादला न्यायच्या आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. मुंबई घेण्याचा प्रयत्न आतापर्यंत खूपवेळा करण्यात आला, मात्र तो यशस्वी झाला नाही.
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असे दानवेंनी ठामपणे सांगितले. शिवसेनेने आतापर्यंत काही परवानग्याच घेतल्या असे नाही. आम्ही परवानगी नाकारली तर जनतेच्या दरबारात जाऊ. आमचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार, असे ते म्हणाले. तर 12 सप्टेंबरला मुख्यमंत्री पैठणला जात आहेत. बघा काय होते ते, असेही ते म्हणाले.