पुणे – महाराष्ट्र पोलीस सोशल मीडियाबावर(Social Media) सक्रिय होण्याबरोबरच गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आधुनिक पद्धतीने तपासास प्राधान्य देताना दिसून येत आहेत. महाराष्ट्र पोलीस (Maharashtra police)दलाने नुकतच गुन्हेगारांना शोधण्यासाठी बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम विकसित केली आहे. या पद्धतीद्वारे गुन्हेगारांचे (Criminals)बोटांचे ठसेच नाही तर आता तळवे, चेहरा आणि डोळे स्कॅन करून ते डिजिटल पद्धतीने साठवून ठेवण्यास सुरवात करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधिरित ही सिस्टीम बनवण्यात आली आहे. याच्या मदतीने गुन्हांची तात्काळ उकल केली जाणार आहे.या यंत्रणेचा वापर झाल्यावर गुन्ह्यांची झटपट उकल होऊन गुन्हेगार पकडण्याच्या प्रमाणात वाढ होईल, असा विश्वास गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांनी व्यक्त केला.
यापूर्वी गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगारांच्या बोटाचे ठसे घेतेले जात होते. त्यावरून गुन्हेगाराचा शोध घेतला जात होता. त्याची ओळख पटवली जात होती. मात्र आता हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधील चेहरा व छायाचित्रावरुनही गुन्हेगारांची ओळख पटविण्यात येणार आहे. या प्रणालीत आरोपींच्या अंगुली मुद्रा पत्रिका, तळहाताचे ठसे, चेहरा व डोळ्यांची बुबुळे हे डिजिटल स्वरुपात जतन करुन ते पुराव्याशी जुळविण्याची क्षमता आहे.
ऑटोमोटेड मल्टिमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम या संगणकीय प्रणालीचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (पश्चिम) सुरेश मेखला, पोलीस उपमहानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक ए.डी. शिंदे, देशपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक पल्लवी बर्गे, रोहिदास कसार, अविनाश सरवीर, रुपाली गायकवाड यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.