पुणे : पुणे ते लोणावळा लोकलमध्ये (Pune to Lonavala local) केवळ 45 टक्केच प्रवाशांची संख्या असल्याचे समोर आले आहे. कोविडचे (Covid) निर्बंध शिथिल केल्यानंतरही पुणे रेल्वे विभागातील पुणे-लोणावळा मार्गावरची ही स्थिती आहे. या मार्गावर 13 लोकल धावतात. असे असतानाही प्रवाशांची संख्या 45% आहे. कोविडच्या उद्रेकापूर्वी या मार्गावर सुमारे 21 लोकल धावत होत्या. 13 गाड्या पुणे आणि लोणावळा यादरम्यान दररोज 26 फेरी करतात आणि साथीच्या आजारापूर्वी ही संख्या 21 ट्रेन आणि 42 फेऱ्या अशी होती. सर्व 26 लोकल ट्रेन (Train) पुन्हा सुरू करण्याची मागणी असली तरी सध्याच्या प्रवासी संख्येनुसार 13 गाड्या पुरेशा आहेत. प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर आम्ही आणखी गाड्या वाढवू, असे पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते मनोज झंवर यांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्यातरी या मार्गावर नवीन गाड्या धावणार नसून 13 गाड्याच धावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्या लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे आणि दुसरा डोस मिळाल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत, त्यांना गेल्या वर्षी 15 ऑगस्टपासून लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. पहिल्या कोविड लाटेनंतर, अत्यावश्यक सेवांसाठी काम करणाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2020मध्ये पुणे-लोणावळा लोकल ट्रेन सुरू करण्यात आल्या. चार लोकल गाड्या एका दिवसात आठ फेऱ्या करत होत्या.
ते म्हणाले, की आम्ही जुलै 2022पासून लोकल ट्रेनमध्ये अधिक लोक, प्रामुख्याने शाळा, कार्यालय आणि महाविद्यालयात जाणारे पाहू शकतो. तळेगावहून शिवाजीनगरला जाणाऱ्या आणि नेहमीच्या प्रवाशांच्या मते, तळेगावहून परतताना शिवाजीनगर येथे संध्याकाळी सहाच्या सुमारास गर्दी दिसायची, पण आता मोजकेच प्रवासी दिसतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तसेच वाढते ऊन यामुळे प्रवाशांची संख्या कमी आहे. तर काही ठिकाणी अजूनही वर्क फ्रॉम होम असल्यामुळे प्रवाशांची संख्या काहीशी कमी आहे. त्यामुळे लोकल ट्रेन वाढवून सध्यातरी रेल्वेचे उत्पन्न वाढणार नसून प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद देणे गरजेचे आहे. रेल्वेतर्फेही हेच सांगण्यात आले आहे.