खेड, पुणे : खेड (Khed Pune) तालुक्यातील वाळद येथील जमिनीच्या सातबारावर नोंद घालण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत पोलिसांनी (Anti-Corruption Bureau) रंगेहात पकडून अटक केली आहे. खेड तालुक्यातील टोकावडे सजाचे सुजित सुधाकर अमोलिक असे कारवाई केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणात खेड तालुक्यातील वाळद येथील तक्रारदार यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक तलाठी अमोलिक यांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोड करत चार हजार रुपये देण्याचे ठरले होते. दरम्यान, लाचेची (Bribe case in pune) मागणी केल्याची तक्रार पुणे लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली होती. त्यानुसार कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या तलाठ्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
तक्रारीनुसार तालुक्याच्या ठिकाणी राजगुरूनगर येथे असलेल्या कार्यालयात ही लाच स्वीकारण्यात येणार होती. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. यामध्ये पाच अधिकारी कार्यरत होते. त्यानंतर लोकसेवक तलाठी अमोलिक यांना चार हजार रुपये लाच स्वीकारल्यावर लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी राजगुरूनगर येथील तलाठी कार्यालयात अटक केली.
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम सात अन्वये खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शासकीय कार्यालयात लालेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार लाच देण्यास तयार नव्हते मात्र तलाठ्याने पाच हजारांची मागणी केली होती. शेवटी चार हजार देण्याचे ठरले. त्यातही पाच अधिकारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पुणे युनिटच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील अधिक तपास करत आहेत.
खेडमधीलच आणखी एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे वृत्त आहे. खेड तालुक्यातील मोई येथे मॉर्निग वॉकला गेलेल्या तानाबाई येळवंडे या वृद्ध महिलेचा चोरीच्या उद्देशाने डोक्यात रॉड मारून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिन्याची चोरी केली होती. यात या महिलेचा मृत्यू झाला होता. महाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेत महाळुंगे पोलिसांनी या खूनप्रकरणी एकाला अटक केली आहे.