पुणे : प्रत्येक पाच व्यक्तींपैकी चार व्यक्तांना मानसिक आरोग्याच्या समस्येने (Mental health issue) ग्रासले आहे. सुमारे 80 टक्के रहिवाशांना मानसिक आरोग्याची समस्या जाणवत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. मानसिक आरोग्य सेवा प्रदाता एमपॉवर आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या (Aditya Birla Education Trust) पुढाकाराने अलीकडेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांचे याविषयी सर्वेक्षण केले. यात ही बाब उघड झाली आहे. पुण्यातील 85 टक्के स्त्रिया आणि 70 टक्के पुरुषांना मानसिक आरोग्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि नैराश्य हे स्त्रियांमध्ये सर्वात मोठे कारण आहे. तर चिंता आणि पॅनिक डिसऑर्डर हे पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहे. एमपॉवर (Mpower) पुणे मेंटल हेल्थ स्कोअरने 18 ते 24 वर्षे वयोगटातील (युवक आणि किशोरवयीन) 25 ते 40 वर्षे (प्रौढ आणि कार्यरत लोकसंख्या) आणि 60 वर्षे आणि त्यावरील (वृद्ध लोकसंख्या) निष्कर्षांचे मूल्यांकन केले.
नुकत्याच जारी केलेल्या निवेदनात, एमपॉवरच्या संस्थापक आणि अध्यक्षा, डॉ. नीरजा बिर्ला म्हणाल्या, की एमपॉवर येथे आम्ही भारतातील मानसिक आरोग्याच्या चिंतेबद्दल जागरूकता निर्माण करणे, गरजू लोकांना मदत आणि सेवा मिळविण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे. शहर-विशिष्ट मानसिक आरोग्य स्कोअरच्या लाँचद्वारे आम्ही प्रत्येकाला हे लक्षात आणू इच्छितो, की मानसिक आरोग्य आता दुर्लक्ष करता येणारा विषय नाही. मानसिक आरोग्याचा त्रास कोणत्याही वयोगटातील आणि आजूबाजूला कोणालाही होऊ शकतो.
सध्या सुरू असलेला साथीचा रोग आणि विलगीकरण, अस्थिरता आणि चिंता यांच्या प्रभावामुळे आपल्यापैकी अनेकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.या त्रासाला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे हे मान्य करणे आणि योग्य व्यावसायिक मदत घेणे म्हणजेच समुपदेशन हा होय. कारण मानसिक आरोग्याच्या समस्यांसह जगणे केवळ एखाद्याच्या आनंदाचे जीवनच नकारात्मक नाही करत तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. कारण या बाबी अप्रत्यक्षपणे उत्पादकता आणि वाढीस बाधित करतात, असे बिर्ला म्हणाल्या.
या सर्वेक्षणातून आणखी काही बाबी समोर आल्या आहेत. जसे की, 18 ते 24 वयोगटातील 88 टक्के तरूण मानसिक आरोग्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. पुण्यातील तरुणांमध्ये दिसणाऱ्या काही प्रमुख मानसिक आरोग्यावरील ताण म्हणजे मूड डिस्टर्बन्स आणि चिंता. अनेकांना पॅनिक डिसऑर्डर, अस्थिरता, गैरवर्तन आणि खुल्या नातेसंबंधांच्या समस्यांचा त्रास होतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.