पुणे : बैलगाडा शर्यतीमध्ये उभारलेले प्रेक्षकांचे स्टॅन्ड कोसळून एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना पुण्याजवळील वडकी येथे घडली. वडकी या ठिकाणी काल बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे शर्यत रद्द करण्यात आली. अचानक आलेल्या पावसामुळे प्रेक्षकांची तारांबळ उडाली आणि दरम्यान बसण्यासाठी लावण्यात आलेले बेंच कोसळले. स्टँडला लोखंडी पाऱ्यांचे रिल लावले होते आणि मोकळ्या मैदानात लावल्यामुळे ते रेलिंग खचले. घटनेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान बाळासाहेब कोळी यांचे निधन झाले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाळासाहेब हे सातारा जिल्ह्यातील निनम पाडळी गावातील रहिवासी आहेत. जखमींपैकी शुभम विजय लोखंडे आणि मयूर प्रसाद लोखंडे हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील शेतकरी आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील विकास वाल्मिक ढमाले असे जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अचानक पाऊस आल्याने काही प्रेक्षखांनी पावसापासून बचाव करण्यासाठी स्टँडखाली आसरा घेतला होता. मात्र मुसळधार पावसामुळे स्टँडखालील माती सैल झाली होती. त्यामुळे तो स्टँड खाली उभ्या असलेल्या प्रेक्षकांवर कोसळला. अपघाताची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. बाळासाहेब कोळी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अन्य तीन जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले.