मुंबई : आमच्या घामाच्या पैशातून योजना निर्माण होतात. या योजनांवर तुम्ही श्रेयवादाच राजकारण करण्याची काही गरज नाही. हे लोकांचे पैसे लोकांच्या सोयीसाठीचे आहेत. लोकांसाठी वापरले गेले आहेत. तुम्ही कर्म धर्म संयोगानं त्या खुर्चीवर आहात. याचा अर्थ तुम्ही भाग्यविधाता असल्याचं थाटात वावरायचं काही कारण नाही. त्यामुळं पक्षप्रमुखांनी मांडलेली भूमिका योग्य आहे, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य प्रचंड दुर्दैवी आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या अखित्यारीत असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधन प्रकाशन समितीच्या सदस्यपदाचा काल राजीनामा दिला. राजीनामा परत घ्यावा, असं चंद्रकांत पाटील मला बोलत होते, असंही त्या म्हणाल्या.
निषेध संसदीय मार्गानं व्यक्त केला आहे. शाई कुठं वापरायची याचं भान मला आलं पाहिजे. ती शाई किती जास्त बोटांना लागते याचा विचार करेन. भाजपची विचारधारा हरविण्यासाठी बॅलेट बॉक्समधून ती शाई कशी वापरता येईल. यासाठी प्रयत्न करेन, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
भाजपच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान केला जातो. यावर उपमुख्यमंत्री चकार शब्दानं बोलत नाहीत. निंदाजनक प्रस्ताव सभागृहात मांडायला हवं होतं. पण, असं करण्यात आलेलं नाही, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत केली पाहिजे. रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतीचा मार्ग हा बॅलेट बॉक्समधून जातो. त्यातून ती शाई वापरली गेली पाहिजे.
गेल्या काही दिवसांपासू्न सर्व महापुरुषांचा ठरवून अवमान केला जातो. राज्यपाल कोश्यारी कशाच्या आधारावर बोलत होते. प्रसाद लाड किंवा मंगलप्रभात लोढा कशाच्या आधारावर बोलत होते. ही सर्व मंडळी भाजपचीच का आहे, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.