पंढरपूर: अठ्ठावीस युगांपासून कर कटेवर ठेवून उभा असलेल्या वारकरी आणि सर्वांचा लाडका विठुराया मार्गशीर्ष महिन्यात चंद्रभागेतील विष्णुपद मंदिरात वास्तव्याला असतो. तब्बल महिनाभर त्यांचा मुक्काम या विष्णुपद मंदिरात असतो, यामागील आख्यायिका नेमकी काय आहे? आपण जाणून घेऊया. (Legend of Vishnupada temple at Pandharpur)
पंढरपूरपासून जवळ असलेल्या गोपाळपूरनजिक चंद्रभागेच्या पात्रात एक पुरातन मंदिर आहे. या मंदिराला विष्णुपद मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराबाबत पद्म पुराणात एक आख्यायिका सांगण्यात आली आहे. जेव्हा रुक्मिणी विठुरायावर रुसून दिंडीर वनात आली. तेव्हा देवीच्या शोधात विठुराय पंढरपुरात सर्वात प्रथम ज्या ठिकाणी आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक. या ठिकाणी एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहुडाचरण पावलं उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची आणि काल्याच्या वागड्याची खूण दिसते. या शिळेवर दगडी मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपाच्या खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहुडाचरण मुरलीधराची मू्र्ती कोरण्यात आली आहे.
विठ्ठलाने या ठिकाणी आपले सवंगडी आणि गाईंसह क्रीडा केल्या. या ठिकाणी सर्वांची भोजन केलं. तेव्हा इथं देवाची आणि गाईची पावलं उमटली. विठ्ठल हे विष्णूचे अवतार असल्यानं इथं उमटलेल्या पावलांमुळे या चंद्रभागेतील खडकावरील ठिकाणाला विष्णुपद असं नाव मिळालं. मार्गशीर्ष महिन्यात विठुराया या ठिकाणी राहायला येतो, असं मानलं जातं. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात या ठिकाणी भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात.
अनेक भाविक नौकानयनाचा आनंद घेत विष्णूपदावर येतात. पंढरपुरातील भाविक जेवणाचे डबे घेऊन याठिकाणी येतात आणि दर्शन घेऊन झाल्यावर वनभोजनाचा आनंद लुटतात. मार्गशीर्ष शुद्ध वारीला पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्याही बारस सोडण्यासाठी विष्णूपदावर येत असतात.
मार्गशीर्ष आमावस्येला विठुराया पंढरपुरातील मंदिरात परत जातात. त्या दिवशी संध्याकाळी विष्णूपदावर एक रथ आणला जातो. या रथाला ज्वारीच्या ताटं लावून सजवला जातो. विष्णुपदावर अभिषेक करुन मग दिंडी काढली जाते आणि विठ्ठल पु्न्हा पंढरपुरातील आपल्या मंदिरात विराजमान होतात.
संबंधित बातम्या:
पंढरपुरात संजीवन समाधी सोहळ्याचा उत्साह, भक्तांच्या भेटीला साक्षात श्री. विठ्ठल!
PHOTO | कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई
Legend of Vishnupada temple at Pandharpur