उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? पुण्यात खळबळ

| Updated on: Apr 02, 2024 | 7:06 PM

पुण्यात ससून रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रुग्णाला आयसीयू वॉर्डमध्ये दाखल केलेलं असताना त्याला उंदीर चावला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

उंदीर चावल्यामुळे ससून हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू? पुण्यात खळबळ
ससून रुग्णालय, पुणे
Follow us on

उंदीर चावल्यामुळे ससून रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे. या आरोपांमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. विशेष म्हणजे ससून रुग्णालयाचा ढिसाळ कारभार सातत्याने चव्हाट्यावर येतोय. ससून रुग्णालय याआधी ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता रुग्णालयात रुग्णाला उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करणारं प्रकरण समोर आलं आहे. संबंधित प्रकरणामुळे ससून रुग्णालय पुन्हा चर्चेत आलं आहे. रुग्णाला आयसीयू वॉर्डमध्ये उंदीर चावत असेल तर त्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नेमकं प्रकरण काय?

ससून रुग्णालयात सागर रेनुसे नावाचा रुग्ण गेल्या 10 दिवसांपासून उपचार घेत होता. पण आयसीयू वार्डमध्ये त्याला उंदीर चावला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांना केला आहे. ससून रुग्णालय प्रशासनाकडून जो रिपोर्ट देण्यात आलाय, त्यामध्ये रुग्णाला उंदीर चावल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

रुग्णालयाचे डीन काय म्हणाले?

या प्रकरणावर ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ससूनमध्ये असा प्रकार घडला आहे का? या संदर्भात चौकशी समिती गठीत करुन चौकशी केली जाईल. खरंच उंदीर चावला आहे का? याची आम्ही तपासणी करू. हा रुग्ण आमच्याकडे १६ तारखेला भरती झाला होता. रुग्ण दारू पिवून पडला. त्यामुळे त्याचे पाय निकामी झाले होते. २९ तारखेपासून तो व्हेंटिलेटरवर होता. १ तारखेला आमच्याकडे सकाळी तक्रार आली की त्याला उंदीर चावला आहे. मात्र त्याच्या मृत्यूशी हे कारण जोडणं योग्य नाही. आम्ही याची चौकशी करू. तो रिपोर्ट समोर येईल”, अशी प्रतिक्रिया रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांनी दिली.