पुणे : ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Datta Bharne) यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप, खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील या महत्त्वाच्या जागाही आधीच बिनविरोध झाल्या आहेत. अर्ज मागे घेण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील 21 जागांपैकी 14 जागा बिनविरोध झाल्या आहेत. सात जागांसाठी आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कालपर्यंत 123 उमेदवारांनी माघार घेतली. तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची “ब” वर्गातून बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचाही बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate), पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap) बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांचीही बिनविरोध वर्णी लागली.
पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.
संचालक पदाच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 10 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. अखेरपर्यंत 123 उमेदवारांनी माघार घेतली.
निवडणूक कार्यक्रम
– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022
– मतमोजणी : 4 जानेवारी 2022
बँकेचे संचालक मंडळ : 21
– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13
– ब मतदार संघ : 1
– क मतदार संघ : 1
– ड मतदार संघ : 1
– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1
– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1
– विभक्त जाती व प्रजाती : 1
– महिला प्रतिनिधी : 2
संबंधित बातम्या :
Ajit Pawar | पुणे जिल्हा बँक अध्यक्षपदासाठी अजितदादा आठव्यांदा उत्सुक, यंदा 30 जणांचं आव्हान