रणजित जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पिंपरी चिंचवड | 21 फेब्रुवारी 2024 : अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. आज बारमतीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यलयात युगेंद्र पवार गेले होते. तिथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यामुळे युगेंद्र पवार हे राजकारणात येणार का? याची चर्चा रंगली आहे. यावर आमदार रोहित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच बारामतीत जर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली तर काय होणार? यावरही रोहित पवारांनी भाष्य केलंय.
युगेंद्र पवार आज बारामतीच्या आमच्या कार्यालयात गेले आहेत. ते कार्यकर्त्यांशी काय बोलले हे पहावं लागेल. युगेंद्र पवार म्हणत असतील शरद पवार साहेब तसं… म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या लहानांना हे कळतंय, की पवारसाहेबांना साथ देण्याची गरज आहे, असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवार घरातच एकटे पडलेत का अशी चर्चा होत आहे. यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलंय. अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. पण ते सध्या ते स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलतात, असं रोहित पवार म्हणाले.
मी पुन्हा येईननंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार म्हणतात… आता अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ पवारही उमेदवार असू शकतो. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. साहेब काय बोलतील हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं आजच्या सभेत ते काय बोलतील याची उत्सुकता आहे, असं रोहित पवार म्हणाले.
बारामती लोकसभेत काकी विरुद्ध आत्या अशी लढत झालीच तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आत्तापर्यंत राजकारणात नव्हत्या,. त्यांनी केवळ समाजसेवा केली. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी लढत होणात, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असं रोहित पवार म्हणाले.